प्रतिनिधी//
एटापल्ली : शहराच्या हद्दीत सुरू असलेल्या एका पुलाच्या कामामुळे परिसरातील नागरिक धुळीच्या त्रासाने हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, बांधकाम सुरू असताना रस्त्यावर पाण्याची फवारणी न केल्याने धुळीचे लोट सर्वत्र पसरले आहेत. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, दैनंदिन जीवनात मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावर सध्या एका महत्त्वाच्या पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. मात्र, या कामामुळे मोठ्या प्रमाणात माती आणि धुळ उडत आहे. नियमानुसार, बांधकाम ठिकाणी धूळ नियंत्रण करण्यासाठी नियमितपणे पाण्याची फवारणी करणे आवश्यक आहे. परंतु, या ठिकाणी बांधकाम ठेकेदार आणि संबंधित प्रशासनाकडून या नियमांचे सरळसरळ उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
“या रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे,” असे येथील एका स्थानिक नागरिकाने सांगितले. “धुळीमुळे श्वास घेणेही कठीण झाले आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त त्रास होत आहे.प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दुचाकीस्वारांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. धुळीमुळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाली असून, अपघातांचा धोका वाढला आहे. अनेक वाहनचालकांना डोळ्यांची आणि श्वसनाची समस्या जाणवत आहे.
या गंभीर परिस्थितीकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. बांधकाम ठिकाणी नियमित पाण्याची फवारणी करून नागरिकांना या त्रासातून मुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील. आता तरी प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.