एटापल्ली तालुक्यात बायोमेट्रिक प्रणालीचा अभाव — ग्रामसेवक ठेकेदारीत व्यस्त, नागरिकांचे काम ठप्प

123

एटापल्ली:

शासनाने ग्रामसेवकांसाठी बायोमॅट्रिक हजेरी अनिवार्य केली असली तरी एटापल्ली तालुक्यातील 31 ग्रामसेवक अद्यापही जुनीच पद्धत अवलंबत असून, ते बायोमॅट्रिक हजेरी टाळत आहेत. परिणामी, स्थानिक नागरिकांना शासकीय कामांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांमध्ये ग्रामसेवक अपुरा वेळ कार्यालयात हजर राहतात किंवा बाहेरगावी असल्याने नागरिकांचे अर्ज आणि इतर शासकीय प्रक्रिया खोळंबत आहेत

तालुक्यातील अनेक ग्रामसेवक हे गडचिरोली, चामोर्शी, अहेरी आणि आल्लापल्लीसारख्या ठिकाणा वरून अपडाऊन करीत असतात आणी. विविध शासकीय मिटिंग्ज, प्रशिक्षण, आणि इतर निमित्ताने हे अधिकारी त्यांच्या नियुक्त गावांपेक्षा जिल्ह्याच्या इतर भागांत जास्त सक्रिय दिसतात. काही ग्रामसेवक तर खाजगी कारणांसाठीही बाहेरगावी जातात, त्यामुळे गावांमध्ये ग्रामपंचायतींचे दैनंदिन काम ठप्प होण्याची वेळ आली आहे.
ग्रामसेवकांकडून वारंवार ऑनलाईन मिटिंग असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात या मिटिंग्स किती प्रभावीपणे पार पडतात यावर प्रश्नचिन्ह आहे. ऑनलाईन मिटिंगच्या नावाखाली अनेक ग्रामसेवक कार्यालयात येत नाहीत, त्यामुळे नागरिकांचे अर्ज मंजुरीसाठी पडून राहतात. लाभार्थी योजनांची अंमलबजावणी, जमिनीच्या नोंदी, इत्यादी शासकीय कामे आधी यांसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये मोठा विलंब होत आहे.

राज्य शासनाने बायोमॅट्रिक हजेरी सक्तीची केली असली तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक ग्रामसेवक त्यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर न राहता बाहेरगावी जात आहेत, मात्र तरीही त्यांची हजेरी लागत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जर बायोमॅट्रिक प्रणाली अस्तित्वात आहे, तर गैरहजेरी नोंदली जात नाही याचे उत्तर प्रशासनाकडे आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

गावातील शासकीय योजनांचे लाभ घेण्यासाठी नागरिकांना अनेक वेळा ग्रामसेवकांना भेटावे लागते. मात्र ते वेळेवर उपलब्ध नसल्याने शेतकरी, महिला, वयोवृद्ध आणि गरजू नागरिकांचे हाल होत आहेत. रोजगार हमी योजनेच्या नोंदी, जन्म-मृत्यू दाखले, विविध योजना यांचे कागदपत्रे घेण्यासाठी लोकांना वारंवार ये-जा करावी लागत आहे. काही ठिकाणी तर नागरिकांनी ग्रामसेवकांविरुद्ध तक्रारीही दाखल केल्या आहेत, पण वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.

ग्रामसेवकांची शिस्त सुधारण्यासाठी बायोमॅट्रिक हजेरीची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी गावात थेट पाहणी करून प्रत्यक्ष ग्रामसेवक उपस्थित आहेत की नाही, याची खातरजमा करावी. गावकऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जाव्यात आणि गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

*एटापल्लीतील ग्रामसेवक ठेकेदार बनले; शासकीय कामांऐवजी भ्रष्टाचाराला प्राधान्य*

एटापल्ली तालुक्यातील अनेक ग्रामसेवक आपल्या शासकीय जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून ठेकेदारीच्या व्यवसायात गुंतल्याचे चित्र आहे. गावपातळीवरील विकासकामे, पाणीपुरवठा योजना, अंगणवाडी सुधारणा, सिमेंट रस्ते आणि इतर शासकीय प्रकल्पांमध्ये हेच ग्रामसेवक अप्रत्यक्षरित्या ठेकेदार बनले आहेत. स्वतःच काम मंजूर करून, स्वतःच त्याच्या निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपप्रवृत्ती वाढली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही थेट संगड असल्याचे बोलले जाते. स्थानिक स्तरावर हीच मंडळी मोठ्या ठेकेदारांशी हातमिळवणी करून, त्यांच्या मार्फत कामे करून घेत आहेत आणि यातून मोठा आर्थिक व्यवहार केला जात आहे. अनेक ग्रामसेवक आपल्या नातेवाईकांच्या किंवा विश्वासू लोकांच्या नावे फर्म नोंदणी करून ठेके घेतात, त्यामुळे भ्रष्टाचाराची पाळेमुळे अधिक घट्ट होत आहेत. विशेष म्हणजे, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी हडप केला जात असून, दर्जाहीन कामे करण्यात येत असल्याची तक्रारी वारंवार पुढे येत आहेत. मात्र, वरिष्ठ अधिकारी या सर्व घडामोडीकडेच जाणूनबुजून डोळेझाक करत असून, हेच ग्रामसेवक त्यांचे खिसे गरम करत असल्यामुळे कुठलीही कठोर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनातील भ्रष्टाचारी साखळी अधिकच मजबूत होत असून, शेवटी नुकसान मात्र गावकऱ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे होत आहे. जर या गोष्टींना वेळीच लगाम घालण्यात आला नाही, तर भविष्यात मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

_”वरिष्ठ स्तरावरून बायोमेट्रिक हजेरीबाबत स्पष्ट सूचना नाहीत, तरीही तालुक्यातील ग्रामसेवक दांडी मारत असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”_

साईनाथ साळवे
विस्तार अधिकारी (ग्रापं) एटापल्ली