एटापल्ली तालुक्यात भीषण अपघात: दोन दुचाकीस्वार जागीच ठार; सुरजगडवरील लोह वाहतूक पुन्हा चर्चेत

1068

प्रतिनिधी//

एटापल्ली: आज सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील आलदंडी आणि तुमरगुंडा या गावांदरम्यानच्या रस्त्यावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोन दुचाकीस्वार घटनास्थळीच ठार झाले आहेत. मृतांची नावे मार्टिन तिघा (वय 40, रा. पंदेवाही) आणि नागेश गावडे (वय 25) अशी असून, दोघांचाही मृत्यू अत्यंत हृदयद्रावक अवस्थेत झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की एटापल्ली येथून सुरजगड पहाडीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी दुचाकी (क्रमांक MH33Z 9264) विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक (क्रमांक MH34G 6896) ला जोरदार धडकली. धडकेनंतर परिस्थिती इतकी गंभीर होती की दोघांचेही मृतदेह अक्षरशः चेंदा-मेंदा झाले होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले आणि शवविच्छेदनासाठी दोघांचेही मृतदेह स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पुन्हा एकदा सुरजगड पहाडी वरून होणाऱ्या लोह उत्खननाची अवजड वाहतूक चर्चेत आली आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पुन्हा एकदा मागणी केली आहे की या मार्गावरील अवजड वाहतूक रोखावी, तसेच रस्त्यांची डागडुजी करून सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात यावी.

घटनेची माहिती मिळताच आलदंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास आलदंडी पोलिसांकडून करण्यात येत आहे.