माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी दिली भेट
त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची केली मागणी
अहेरी:-तालुका मुख्यालय जवळून वाहणाऱ्या प्राणहिता नदीकाठच्या गावांना चक्री वादळ आणि अवकाळी पावसाचा जबर फटका बसल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले. याची माहिती मिळताच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी भेट देऊन पाहणी केली.
गुरुवारी (13 एप्रिल) रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या चक्री वादळामुळे अहेरी परिसरातील प्राणहिता नदी काठच्या गावांना मोठा फटका बसला.अचानक चक्री वादळ आल्याने अनेकांच्या घरावरचे छप्पर उडून गेले,काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले,तर काही गावातील नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू तसेच चैनीच्या वस्तू खराब झाले.काही कळायचा अगोदरच होत्याचं नव्हतं झालं.
जवळपास अर्धा तास चाललेल्या चक्री वादळामुळे रस्त्यालगत असलेले वीज खांब कोसळले तर काही ठिकाणी वीज तार तुटून पडले.अश्या परिस्थितीत नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती.याची माहिती मिळताच भाग्यश्रीताई आत्राम यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.त्यानंतर भुजंगरावपेठा गावात जाऊन स्वतः नागरिकांशी संवाद साधले.यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
लगेच नुकसानग्रस्त भागात त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार,नगरसेवक श्रीनिवास चटारे,माजी प स सदस्य मांतय्या आत्राम तसेच महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.