एटापल्लीच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी _प्रेस असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन_

138

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

प्रतिनिधी:तेजेश गुज्जलवार

एटापल्ली: नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रणय तांबे यांनी पत्रकारांसोबत आकसपूर्ण भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी एटापल्ली प्रेस असोसिएशनने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

प्रेस असोसिएशनने दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यासाठी नगरपंचायतीकडून रितसर परवानगी घेतली होती. कार्यक्रमासाठी ठरवलेली कर रक्कम ७ जानेवारीला एक दिवस उशिराने जमा झाली, मात्र या गोष्टीचा साधा खुलासा न मागता, मुख्याधिकारी प्रणय तांबे यांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

या प्रकारामुळे पत्रकारांना मानसिक त्रास सहन करावा लागला. रक्कम भरण्यासाठी गेलेल्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना नगरपंचायतीतील शिवाजी रसाळ यांनी नकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे परिस्थिती अधिक बिघडली.

पत्रकारांच्या कार्यावर अंकुश ठेवण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडून हेतुपुरस्सर दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रक्कम जमा करण्यासाठी संघटनेला दिलेल्या मुदतीत अधिक स्पष्टता नसल्याने गैरसमज टाळता आला असता, परंतु याबाबत जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले. पत्रकारांवर तक्रारीद्वारे दबाव निर्माण करण्याचा प्रकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष शेषराव संगीडवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनादरम्यान प्रमुख सल्लागार विनोद चव्हाण, सदस्य मणिकंठ गादेवार, तेजेस गुज्जलवार, गजानन खापने, मुकेश कावळे, तनुज बल्लेवार, राकेश तेलकुंटवार यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रेस असोसिएशनने ठाम भूमिका घेतली आहे की, पत्रकारांच्या प्रतिष्ठेवर डाग लावण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. दोषींवर त्वरित कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या घटनेमुळे एटापल्लीतील पत्रकार व जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशी आक्रमण करण्याऐवजी पत्रकारांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे.