मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरजागड लोह प्रकल्पाने जनतेच्या जीवनात उच्छाद मांडला आहे. या प्रकल्पामुळे लोह उत्खनन व वाहतुकीसाठी होणाऱ्या कामांमुळे संपूर्ण एटापल्ली शहर धुळीच्या साम्राज्यात अडकला आहे. एटापल्लीतील मुख्य रस्ते खराब झाले असून, धुळीमुळे व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, आणि सामान्य नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे.
*रस्त्यांची दुर्दशा, धुळीचा त्रास*
सुरजागड खाण प्रकल्पामुळे लोह वाहतुकीसाठी रस्त्यांचा बेसुमार वापर होत आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णवाहिकेची वेळेवर पोहोच, आणि रोजंदारी करणाऱ्या नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. सध्या या रस्त्यावर १०० हून अधिक अपघात झाले आहेत, ज्यामुळे कित्येक जणांना जीव गमवावा लागला आहे.
*शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान*
वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल मिळत नाही आणि नुकसान भरपाई देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. काही शेतकऱ्यांनी या असह्य त्रासामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
*आरोग्यावर गंभीर परिणाम*
ब्लास्टिंग, क्रशिंग, आणि लोह वाहतुकीमुळे उडणारी धूळ वातावरणात प्रचंड प्रदूषण निर्माण करत आहे. परिणामी, स्थानिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, अनेक जण दमा, श्वसनाचे आजार यांना बळी पडत आहेत.
*पाण्याचा प्रश्न आणि जंगलाची हानी*
प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे. तसेच, हा प्रकल्प तालुक्यातील जंगलांचे अस्तित्व धोक्यात आणत आहे. त्यामुळे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवासही नष्ट होत आहे.
*प्रशासनाचे दुर्लक्ष आणि जनतेचा रोष*
सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, आणि राजकीय पक्षांनी वारंवार निवेदने देऊन आंदोलन केले असले तरी प्रशासन-शासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. कंपनीच्या फायद्यासाठी सामान्य जनतेचे जीवनमूल्य धोक्यात येत आहे, याचा संताप स्थानिकांमध्ये आहे.
*सरकारला जनतेचा प्रश्न ऐकण्याची गरज*
सुरजागड प्रकल्पामुळे स्थानिक जनतेला होणाऱ्या त्रासाला त्वरित वाचा फोडली पाहिजे. रस्त्यांची डागडुजी, पिकांच्या नुकसानभरपाईसाठी योजना, आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत. अन्यथा, जनतेचा आक्रोश आणखी उग्र होण्याची शक्यता आहे.
सुरजागड प्रकल्प: फायदा की फसवणूक? या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत एटापल्ली तालुक्यातील संघर्ष असाच सुरू राहील.