प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
एटापल्ली : संस्कार पब्लिक स्कूलने शाळेतील स्वच्छता आणि शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छता मॉनिटर निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि शाळेच्या परिसराची स्वच्छता टिकवण्याचे वचन दिले.
शाळेची मुख्याध्यापिका पूजा दासरवार यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन केले आणि स्वच्छतेचा अंगीकार करण्यासाठी प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने त्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यंदाच्या स्वच्छता मॉनिटरपदी पाचवीच्या विद्यार्थिनी ओवी राजकोंडावार हिची निवड करण्यात आली. तिच्या उत्साही भाषणाने विद्यार्थ्यांना प्रेरित केले आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याची प्रतिज्ञा दिली.
स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी चित्रकला, निबंधलेखन आणि भाषण स्पर्धांमध्ये आपली सृजनशीलता दाखवली. या प्रसंगी शाळेतील शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या व्यवस्थापनाने स्वच्छता मॉनिटर म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातील उपक्रमातही विद्यार्थ्यांनी असाच सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. मागील वर्षीही शाळेने यात सक्रिय सहभाग घेतला होता.