प्रतिनिधी//
अहेरी- येथिल राजे धर्मराव कृषि विद्यालयाच्या १९८५च्या दहाव्या वर्गातील वर्गमित्र-मैत्रिणींची तब्बल ३९ वर्षा नंतर भेट घडून आली. आणि त्यांनी सलामत रहे.. दोस्ताना हमारा….. हे गित गात जुन्या आठवणींना उजाळा दिला, ७ जून २०२४ रोजी माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मानव मंदिर सभागृह अहेरी येथे पार पडले, या वेळी सारेच गहिवरले होते.
सन 1985 च्या दहाव्या वर्गातील मित्र- मैत्रिणींनी एकत्र यावे अशी कल्पना वर्गमित्र श्री. राजेंद्र पारेल्लिवार यांना सुचली. आणि त्यांनी व्हॉटसअप ग्रुप बनविला आपल्या वर्ग मित्रांना संपर्क करण्यास सुरुवात केली. काहीशी सोशल मिडिया, तर काहींशी कॉल व्दारे संपर्क करण्यात आला, आणि स्नेहसंमेलना चा कार्यक्रम ठरविण्यात आला. १९८५ च्या दहावीचे विद्यार्थी आज विविध शहरात राहतात. मुंबई, नागपूर, तुमसर, चंद्रपूर गडचिरोली, छत्तीसगड राज्यातून व इतर शहरातून ते एकत्र जमले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून धर्मराव कृषी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. विनोद भोसले, उद्घाटक म्हणून श्री.निलकंठ बंडावार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मंगाम सर व श्री. सोनलवार सर उपस्थित होते.
आज काही वर्ग मित्र हयात नाहीत. अश्यांना व स्वर्गिय शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन श्री. लक्ष्मण दुर्गे तर प्रास्ताविक श्री. राजेंद्र पारेल्लीवार यांनी केले. शेवटी हदयस्पर्शी कार्यक्रमांची सांगता म्हणजे आभार प्रदर्शन श्री. चंदू कोमरेवार यांनी मांडले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वितेसाठी वर्गमित्र नामदेव कुसराम, रघुनाथ नैताम, संतोष बेजंकीवार, शंकर बोम्मावार, सौ. वर्षा बुर्लावार,सौ. किरण जोशी यांच्यासह इतर वर्गमित्र-मैत्रिणींनी सहकार्य केले.
तब्बल ३९ वर्षानंतर एकत्र येत वर्गमित्र मैत्रिणीनी आपला कौटुंबिक परिचय देत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सर्वच जुने मित्र – मैत्रिणी एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. श्री. निलकंठ बंडावार सर आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विनोद भोसले यांनी आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून आपण कुटुंब कसे चालवावे, सुनेला आपलेसे कसे करावे, समाजात कसे वागावे, याबाबत मार्गदर्शन केले. श्री विनोद भोसले सरांनी त्यांच्या तत्कालीन सर्व १९८५ च्या सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देत स्वागत केले.
यावेळी नृत्य, समुहनृत्य, गायन स्पर्धा घेण्यात आले. यावेळी कोणाचा मुलगा, मुलगी कुठल्या पदावर व सेवेत आणि क्षेत्रात काम करित आहे याची माहिती मित्रांनी जाणून घेतली.