ग्रामीण पाणीपुरवठाचे तीन तेरा – स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष; संतोष ताटीकोंडावार

149

.
अहेरी :जलजीवनच्या माध्यमातून प्रत्येकी घरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे नियोजन आहे. याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्ह्याभरात नळ योजना कार्यान्वीत करण्यात आल्या असून अनेक ठिकाणी नळ योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र घरोघरी नळाद्वारे पाणी पोहचविणा-या जलकुंभाच्या स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जवळपास 450 च्यावर पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पुरवठण्याचे शासनाचे नियोजन असले तरी दुसरीकडे चित्र मात्र वेगळेच आहे. या नळ योजनेच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनावर आहे. पाणी पुरवठा करण्यासाठीची मोटार, वीज पुरवठा व इतर बाबी योग्य स्थितीत ठेवणे ही कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. मात्र ग्रामपंचायतीने या कामाकडे दुर्लक्ष केल्याने तसेच अनेक ग्रापंचे आर्थिक नियोजन ढाळसल्याने यातील अनेक नळ योजना अनेक वर्षापासून बंद असल्याचे भीषण वास्तव्य आहे. विशेष म्हणजे घरोघरी नळाला पाणी ज्या जलकुंभातून दिल्या जाते. त्या जलकुंभाच्या स्वच्छतेची जबाबदारी स्थानिक प्रशासनाचे असते. जलकुंभाची स्वच्छता दर सहा महिन्यांनी करण्याचे आदेश असतांना जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीना जलकुंभाची शेवटची स्वच्छता केव्हा केली? हेच आठवत नसल्याचे भीषण चित्र आहे. स्थानिक प्रशासनाने जलकुंभ स्वच्छतेबाबत दाखविलेली उदासीनता नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणारी ठरु पाहत आहे.
बॉक्ससाठी…
जलकुंभ स्वच्छतेचा ग्रापंला विसर
शहरासह ग्रामीण भागात कार्यान्वीत नळ योजनेच्या जलकुंभाची दर सहा महिन्यांनी स्वच्छता करण्याचे आदेश आहे. यात पाणी परीक्षण करणे, ब्लिचींग पावडर टाकणे, टाकीची रितसर स्वच्छता करणे आदी बाबींचा समावेश आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक ग्रापं प्रशासनामार्फत जलकुंभाची नियमित स्वच्छता केली जात नसल्याचे उघडकीस येत आहे. याकरिता अपुरे मनुष्यबळ तसेच निधीची कमतरता याचा बाऊ केल्या जात आहे. जलकुंभ देखभाल दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी ग्रापं प्रशासनाला स्वत: करायची असते. मात्र अनेक ग्रापंचे आर्थिक नियोजन ढासळले राहत असल्याने जलकुंभाच्या स्वच्छतेकडे कानाडोळा केला जात आहे.
बॉक्ससाठी…
जलकुंभ स्वच्छतेसाठी विशेष निधी नाहीच
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत ग्रामीण तसेच प्रादेशिक योजनेअंतर्गत यापूर्वीच जिल्हाभरातील 322 गावांसाठी नळ योजना कार्यान्वीत असून पाणी पुरवठ्यासाठी 270 जलकुंभ उभारण्यात आले आहेत. तर सद्यस्थितील जलजीवन मिशन अंतर्गत 172 गावात 146 जलकुंभ उभारण्यात येत आहेत. यातील अनेक नळ योजना पुर्णत्वास आल्या असून काही प्रगतीपथावर आहे. कंत्राटदारामार्फत काम पूर्ण झाल्यावर तीन महिन्यानंतर नळ योजना स्थानिक ग्रापंला हस्तांतरीत करण्यात येते. यानंतर या नळ योजनेच्या देखभालीची जबाबदारी स्थानिक ग्रापं प्रशासनाची आहे. जलकुंभ स्वच्छतेसाठी शासनाकडून कोणताही निधी प्राप्त होत नसून स्थानिक स्तरावरील कर वसुलीतूनच याचे नियोजन करावयाचे आहे.
नितीन पाटील, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिप)
बॉक्ससाठी…
तालुकानिहाय जलकुंभाची संख्या
तालुका गावे जलकुंभ
गडचिरोली 51 47
चामोर्शी 58 51
अहेरी 26 18
आरमोरी 34 29
भामरागड 02 02
धानोरा 33 21
देसाईगंज 81 16
एटापल्ली 14 14
कोरची 60 07
कुरखेडा 30 28
मुलचेरा 21 15
सिरोंचा 25 22
एकुण 322 270
——————————————
3 जीएडी 11 – नागेपल्ली येथील बंद असलेल्या जलकुंभाचे छायाचित्र
——————————————-
बॉक्ससाठी…
अनेक जलकुंभ केवळ शोभेच्या वस्तु
घरोघरी नळाद्वारे पाणी शासनाच्या या धोरणानुसार ग्रामीण तसेच दुर्गम भागात नळ योजना कार्यान्वीत करण्यात आल्या. तर काही ठिकाणी नळ जोडणी न करताच निधीची परस्पर उचल केल्याचेही प्रकार घडले आहेत. कार्यान्वीत अनेक ठिकाणच्या नळ योजना अल्पावधीतच बंद पडल्याने ग्रामस्थांना नळाचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. विशेष म्हणजे देखभाल, दुरुस्तीअभावी वर्षानुवर्षे नळ योजना ठप्प पडल्या असून पुरवठ्याचे जलकुंभ केवळ शोभेच्या वास्तु ठरत आहेत. स्थानिक ग्रापं प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते