महाशिवरात्री यात्रेत भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करा – जिल्हाधिकारी संजय मीणा महाशिवरात्री यात्रा आयोजनाचा आढावा

122

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

गडचिरोली दि.२७ : महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, निवास, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या. यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशा सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आज दिल्या.
जिल्ह्यात मार्कंडेश्वर तीर्थक्षेत्र, चपराळा देवस्थान, महादेव डोंगरी यासह विविध ठिकाणी महाशिवरात्री निमित्त 8 मार्चपासून यात्रा प्रारंभ होत आहे. या यात्रेच्या नियोजना संदर्भात श्री संजय मीणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेतला. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपविभागीय अधिकारी ओंकार पवार, विवेक सांळुके, उत्तम तोडसाम, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार तसेच मार्कंडा, चपराळा व पळसगाव येथील मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
यात्रेच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, धर्मशाळेची दुरूस्ती, औषधाचा पुरेसा साठा व वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपलब्धता, पथदिवे, अखंडित विद्युत पुरवठा, मोबाईल शौचालयाची व्यवस्था, भाविकांसाठी पुरेशा बसेस, अग्निशमन यंत्रणा व रुग्णवाहिका आदी आवश्यक सोयी सुविधा भाविकांसाठी सुसज्ज ठेवण्याचे व संबंधित विभागाला नेमून दिलेले कामे व्यवस्थितपणे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मीणा यांनी दिले. तसेच यात्रेदरम्याने दुर्घटना घडू नये यासाठी संबंधीतांना गॅस सिलेंडर वापरण्यास मनाई करण्याच्या सूचना देण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांनी मंदिर व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून यात्रेसाठी अतिरिक्त सुविधेच्या आवश्यकतेबाबत विचारणा करून माहिती जाणून घेतली. चपराळा येथे पाण्याची मोटर, मार्कंडा येथे पोलिस बचाव पथकाला बोट व आवश्यक तेथे दुरूस्ती व डागडुजी आदी बाबींसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
बैठकीला महसूल, पोलिस, वन, सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत, दूरसंचार, अन्न व औषध प्रशासन, ग्रामपंचायत, परिवहन व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.