मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने

94

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//
माझ्या मराठीची बोलू कौतुके/
परि अमृतातही पैजासी जिंके/
ऐसी अक्षरे रसिके/मेळवीन//

महाराष्ट्रात दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतात.कविवर्य कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या बोलीभाषेला एक वेगळा साहित्यप्रकार म्हणून प्रस्थापित करण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. मराठी भाषेला प्रदीर्घ साहित्यिक वारसा आणि परंपरा लाभलेला आहे.देशपातळीवर मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी अहोरात्र श्रम घेतले होते.
कुसुमाग्रजांच्या साहित्याची यादी वाचली तर आपण अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. कुसुमाग्रजांनी इतके प्रचंड आणि प्रतिभेच्या आकाशाला सहजरीत्या गवसणी घालणारे वाड्मय मराठी भाषेच्या इतिहासात त्या काळामध्ये कोणालाही निर्माण करता आले नाही.कुसुमाग्रजांनी मराठी माणसाच्या जाणिवांची उंची आपल्या अलौकिक प्रतिभेने, साहित्याने प्रचंड मोठी वाढवली.कुसुमाग्रजांचे साहित्य आपण जर बारकाईने जर वाचले तर इतर कोणत्याही वाचनाशिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू अनमोल हिऱ्याप्रमाणे पडून, वाचणारा वाचक एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमकल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते.
मराठी भाषा ही एक समृद्ध आणि अभिजात भाषा आहे कुसुमाग्रजांची शिकवण मराठी माणसाला आपला कणा ताठ ठेवून तटस्थ आणि शांतपणे राहण्यास शिकवतो.मराठी राजभाषा दिन साजरा करत असताना कुसुमाग्रजांचे साहित्यिक आणि सामाजिक कार्य यांची आठवण करून देत असतो .त्यांचे कार्य आपण स्मरण ठेवले पाहिजे की त्यांनी दिलेले संस्कार आणि विचार यांचे आपण कायम ऋणाईत आहोत.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आश्वासक पाऊले उचलली जात आहेत. मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी भाषेचा जागर करून राज्यभरात विविध उपक्रम राबवले जातात. मराठी भाषा ही राज्याचा अभिमान असून तिच्या संवर्धनासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.
बऱ्याचदा मराठी भाषेच्या अस्तित्वावर सर्वाधिक कारणीभूत ठरणारा घटक म्हणजे मराठी मातृभाषा असणाऱ्या वर्गाचा शिक्षणाच्या माध्यमातून झालेला गोड गैरसमज.आज स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्रजीचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि चांगली इंग्रजी तेव्हाच येऊ शकते जेव्हा सर्वच विषय इंग्रजीत असतील.इंग्रजीच्या ज्ञान प्राप्तीसाठी स्वीकारण्यात झालेली हीच गल्लत हा मराठीच्या अस्तित्वावरील खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे.
मराठी माध्यमाच्या शाळा तो विश्वास समाजास देण्यात कमी पडल्या हे नाकारता येणार नाही.
इंग्रजी येण्यासाठी इंग्रजी भाषेतून संपूर्ण शिक्षण घेण्याची खरंच आवश्यकता आहे का?किंवा इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतल्यावरच इंग्रजी येते असे आहे का? किंवा इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण केल्यावर इंग्रजी अस्खलित येतेच असे आहे का? याचा सारासार विचार व्हायलाच हवा.
२७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन या निमित्ताने मराठी भाषेच्या सध्या स्थितीबाबत विचार करणे गरजेचे आहे.इंग्रजीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जाते.परंतु आज जागतिक संदर्भातही मराठी भाषकांची असलेली प्रचंड संख्या पाहता तिच्या लोप पावण्याची भीती अनाठायी आहे असेच म्हणावे लागेल.
म्हणूनच आता गरज आहे ती, आपल्या निग्रहाची मराठी भाषेबद्दल रास्त अभिमान बाळगण्याची आणि तिची जोपासना व संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची..

वृंदा संतोष पगडपल्लीवार