– चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 सिरोंचा ते आरसअल्ली पर्यंत झालेल्या रस्ता बांधकामात संबंधित अधिकारी व कंत्राटदारांनी संगणमत करुन कामे न करताच करोडो रुपयाची उचल केल्याचा निदर्शनास येत आहे. परिणामी या रस्ता बांधकामात भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी या बांधकामाची सखोल चौकशी करुन संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अहेरीचे उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांचेकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे की,
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर काम करण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. त्यात नमूद असल्याप्रमाणे करारनाम्यात दिसून येत नाही. टेंडर डाक्युमेंट्स नुसार 33 किमी रस्त्याचे काम आहे. मात्र प्रत्यक्षात 22 किमीचाच रस्ता दाखविण्यात येत आहे. उर्वरित 11 किमी रस्त्याचे काम गहाळ करण्यात आल्याचे निदर्शनास येते. सदर महामार्गाचे बांधकाम साबां विभाग सिरोंचाच्या हद्दीतील आहे. परंतु करारनामा पत्र साबां विभाग 2 गडचिरोली येथे करण्यात आला. ज्या निकषानुसार काम करणे आवश्यक होते, त्यानुसार काम न करता थातूरमातूर काम करण्यात आले आहे. डीबीएम मध्ये कामाची थिकनेस दिलेली असतांना त्यानुसार काम झालेले नाही. राष्ट्रीय बांधकामासाठी पाच कोटीच्या वर बॅच मिक्स प्लांटने काम करणे अनिवार्य आहे. मात्र सदर कंत्राटदाराने नियमानुसार बॅच मिक्स प्लांट वापरणे आवश्यक असताना शासनाची दिशाभूल करीत ड्रम मिक्स प्लांटमधून डांबर वापरले आहे, तर सदर काम करणारी कंपनी यांनी बीआरओचे जुने बॅच प्लांट दाखवून टेंडर पास करवून घेतल्याचे निदर्शनास येत आहे. त्या बीआरओच्या बंद असलेले शासकीय प्लांट व मालमत्ताचे पीडब्ल्यूडी मेकॅनिकलद्वारा प्लांट फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले किंवा नाही? रिक्वेस्ट फॉर प्रपोजलच्या कलम 19.1 नुसार कंत्राट प्राईजमध्ये देशातील सर्व टॅक्स एकत्र घेतले असतांना सदर कंत्राटदार, अधिका-यांनी करारनाम्यात आगाऊ जीएसटीची मागणी केली आहे. सदर महामार्गावर दिशादर्शक फलक, क्रॅश गार्ड, साईन बोड, माहिती फलक, बसस्थानक आदीचे कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नाही. काम न करतांना संपूर्ण देयके उचलले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. सदर कामाचे निरीक्षण करणारे थर्ड पार्टी कन्सटंट, निरीक्षण करणारे साबां विभागाचे वरिष्ठ अधिकारी, साबां विभाग सिरोंचाचे कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता साबां विभाग गडचिरोली, क्वालिटी कंट्रोलचे काम बघणारे एनक्यूएम/एसक्यूएम अधिकारी या संपूर्ण प्रकरणात लिप्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बांधकामाची सखोल चौकशी करुन संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करीत दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ताटीकोंडावार यांनी निवेदनातून केली आहे.
बॉक्ससाठी…
…अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावणार
सिरोंचा-असरअल्ली या महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या दयनिय स्थितीमुळे गरोदर माता, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह प्रशासकीय अधिकारी, कर्मचा-यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकांना पाठीच्या मनक्याचे त्रास वाढले आहेत. सदर रस्ता बांधकामासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला असतांना संबंधित कंत्राटदार तसेच यंत्रणेतील प्रशासकीय अधिकारी निकृष्ट बांधकाम करुन कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करतांना निदर्शनास येत आहेत. त्यामुळे याची चौकशी करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे. येत्या सात दिवसात संबंधितावर ङकारवाई न झाल्यास उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्याचा इशारा संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.
मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले चौकशीचे निर्देश