अहेरी (श. प्र.)
अहेरी-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 353 सी रस्त्याचे काम तत्काळ सुरु करण्यात यावे, रस्ता बांधकाम होईपर्यंत या मार्गावरील जड वाहतूक बंद ठेवावी यासह विविध मागण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात गुरुवार, 9 नोव्हेंबर रोजी महामार्गावरील रेपनपल्ली येथे चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे.
अहेरी-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाची दैनावस्था झाली असून मागील दोन वर्षापासून मंजूर झालेल्या रस्त्याचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. यामुळे वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यासदंर्भात संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी करुनसुद्धा कोणतीही उपाययोजना करण्यात न आल्याने ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात रेपनपल्ली परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. संबंधित संपूर्ण विभागातील अधिकारी आंदोलनस्थळी येऊन ठोस आश्वासन देणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार संतोष ताटीकोंडावार यांनी घेतला आहे.
बॉक्ससाठी…
या मागण्यांचा समावेश
राष्ट्रीय महामार्गाचे काम तत्काळ सुरु करावे, बांधकाम होईपर्यंत या मार्गावरील जड वाहतूक बंद ठेवावी, वन जमिनीवरील अतिक्रमण धारकांचे तीन पिढी पुराव्याची अट रद्द करुन सरसकट कायम पट्टे देण्यात यावे, जात प्रमाणपत्रासाठी पुरावे नसणा-यांची गृह चौकशी करुन जात प्रमाणपत्र देण्यात यावे, छल्लेवाडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होईपर्यंत रेपनपल्ली ग्रापं कार्यालयाला छल्लेवाडा येथे स्थलांतरीत करावे, सामुहिक वनहक्क जमिनीवर ग्रामसभेचा अधिकार असतांना वनविभाग व महसूल विभागाने हस्तक्षेप करु नये आदी मागण्यांना घेऊन सदर आंदोलन पुकारण्यात आले आहे.