गावठाण मोजणी स्तुत्य उपक्रम:माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम

44

चिंचगुंडी येथून गावठाण मोजणीला सुरुवात

अहेरी: गाव व शहरातील जमिनीचे मोजमाप, नोंदणीची व्यवस्था आहे. परंतु बहुतांश लहान गावांमधील गावठाण जमिनीची मोजणी वर्षानुवर्षापासून दुर्लक्षित असल्याने वैयक्तिक अथवा शासनाच्या मालकीच्या गावठाण जमिनीबाबतच्या समस्या वाढल्या आहेत. गावठाणातील जमिनीचे सर्वेक्षण करून अधिकार अभिलेख तसेच मालमत्ता पत्रक तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गावठाणच्या जमिनीचे मोजमाप करून मिळकतीचे नकाशे-पत्रक तयार करण्याचा शासनाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.अहेरी विधानसभेत गावठाण मोजणीला त्यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून शुभारंभ करण्यात आला,यावेळी त्या बोलत होत्या.

अहेरी तालुक्यातील एकूण 156 गावांत गावठाण मोजणी करून आखीव पत्रिका वाटप करण्यात येणार आहे.याचा शुभारंभ अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी ग्रामपंचायत पासून झाली असून गावठाणातील, भोगवटातील जमिनी मोजणी करून नकाशा तयार करण्यात येणार आहे.त्यानंतर संपूर्ण अहेरी विधानसभेत हे काम केले जाणार आहे.

अनेक ग्रामपंचायतींकडे हद्दीचे नकाशेच उपलब्ध नाहीत. त्याच हद्दीत असलेल्या मिळकतींची अचूक माहिती ग्रामपंचायतकडे नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. गावात ग्रामपंचायतच्या मालकीची किती जागा आहे. सरकारी जमिनी किती आहेत. या जमिनीवर अतिक्रमण आहे का, याची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध नसते. गावातील नदी-नाले किंवा ओढे सरकारी संपत्ती असली तरी याचे मोजमाप करण्याकडे दुर्लक्ष झाले होते. आता गावठाणांचे भूमापन झाल्यानंतर सर्व माहिती ग्रामपंचायतींना मिळणार आहे. भूमापनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गावातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्डही दिले जाणार. या योजनेत सर्व गावांचे गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अभिलेख तयार केले जाणार असल्याने नक्कीच ग्रामपंचायतीला याचा फायदा होणार आहे.गावठाण मोजणी शुभारंभ प्रसंगी सामाजीक कार्यकर्ते अरुण मुक्कावार,सरपंच कमला बापू आत्राम,उपसरपंच सुशीला बापू कस्तुरवार,सचिन सोनलवार,चिन्ना मुनूरवार,राजू आत्राम प्रतिष्ठित नागरिक रामन्ना कस्तुरवार,लक्ष्मण तोटावार,बुच्चू  मंचार्लावार आदी उपस्थीत होते.तर नंदा आंबेकर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख गडचिरोली, एस एन पवार उप अधीक्षक भूमी अभिलेख अहेरी,यांच्या मार्गदर्शनात एस आर बोमनवार भूकर मापक,डी एम बोरकर निमतानदार,एन जी पठाण मुख्यालय सहाय्यक,के आर मेश्राम निमतानदार,व्ही एस मेरगु छाननी लिपिक हे गावठाण मोजणीचे काम करणार आहे.

गावठाण मोजणीमुळे सरकारी मालकीच्या मिळकतींचे संरक्षण होते.नकाशा तयार होणार, हद्द निश्चित होणार, मिळकतींचे नेमके क्षेत्र किती हे कळणार, मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार, गावातील रस्ते, सरकारी मोकळ्या जागा, नाले यांची हद्द निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येणार आहे. ग्रामपंचायतींना कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलनासाठी अभिलेख व नकाशे मिळतील त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींनी गावठाण मोजणी करण्यासाठी आलेल्या चमुला सहकार्य करावे असे आवाहन भाग्यश्री आत्राम यांनी केले आहे.

ड्रोनद्वारे अचूक जमीन मोजणी
महसूल,भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोन द्वारे गावठाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ड्रोन द्वारे होणाऱ्या या मोजणीमुळे ग्रामपंचायतींच्या हद्दीचे नकाशे उपलब्ध होणार असून जमीन मोजणीची प्रक्रिया सोपी होऊन नागरिकांना मालमत्तांच्या मालकी हक्कांचे प्रमाणपत्र मिळू शकणार आहेत.