पांजरेपार:दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी मौजा पांजरेपार ता. चिमूर जि. गडचिरोली येथे “घायाळ” या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांच्या उद्देशाबद्दल उपस्थित जनसमुदायास समजावून सांगितले की, ज्या लोकांनी आश्वासनं दिल्यानुसार कामं केली नाहीत त्यांना पदावरून कमी करून नवीन लोकांना संधी मिळावी यासाठी लोकशाहीमध्ये दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात. आपल्या देशात लोकशाहीच्या प्रक्रियेतून कल्याणकारी राज्य स्थापन करण्याची तरतूद संविधानात आहे. कल्याणकारी राज्यात मूलभूत सुविधा शासकीय खर्चाने निर्माण केल्या जातात. त्यामुळे शिक्षण आरोग्य सेवा इत्यादी जनतेला मोफत पुरविणे ही कल्याणकारी राज्याची जबाबदारी आहे. जी सरकार शिक्षणाचे व आरोग्य सेवेचे खाजगीकरणाला प्रोत्साहन देत असेल ते सरकार कल्याणकारी राज्य चालविण्यास योग्य नसल्याने मतदानाच्या माध्यमातून त्यांना सत्तेपासून बेदखल करून नवीन लोकांना संधी देण्यासाठीच दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, उत्पादन खर्चाच्या दीडपट मूल्य देऊ, विदेशातून मोठ्या प्रमाणावर काळा धन आणून प्रत्येकाच्या खात्यात 15–15 लाख रुपये जमा करू, महागाई कमी कररू, दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देऊ अशा प्रकारची आश्वासनं दिली होती परंतु आश्वासनांची पूर्तता करू शकली नाही. तसेच शासकीय शाळेचे खाजगीकरणाचे धोरण सरकारने अवलंबिले आहे, त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांना सुद्धा शिक्षणासाठी पैसे मोजावे लागतील. खाजगी लोकं शिक्षण मोफत देणार नाहीत. सार्वजनिक उपक्रमांच्या खाजगीकरणामुळे सर्वसामान्य जनतेच्या मालकीची म्हणजेच सरकारच्या मालकीची साधन संपत्ती विक्री करण्याचे काम हे सरकार करीत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेने मतदान करतांना कोणत्याही प्रलोभनाला व भूलथापांना बळी न पडता सदसद विवेक बुद्धीचा वापर करून निर्णय घेतला तरच लोकशाही जिवंत राहील. असे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक चिमूर विधानसभेचे काँग्रेसचे समन्वयक डॉ. सतीश वारजूकर व सागर भाऊ साबळे यांनी मार्गदर्शन केले. मंचावर चिमूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय भाऊ गावंडे, माजी पंचायत समिती उपसभापती रोशन भाऊ ढोक, सागर भाऊ साबळे , सरपंचअशा ताई बंगाले, अमोल गजभे, लहुजी भोयर, राहुल भाऊ गुरपुडे, प्रतिभा ताई बोरकुटे व गणमान्य मंडळी तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.