तोडसा येथे मत्स्य व्यवसायाला चालना; पाणी फाउंडेशनतर्फे आदिवासी बांधवांना साहित्य वाटप

67

अमित कत्तीवार | एटापल्ली प्रतिनिधी

एटापल्ली : तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल तोडसा गावात मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी पाणी फाउंडेशन, तेलंगणा राज्य यांच्या वतीने मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. गावातील तलावांमधून मत्स्य उत्पादन वाढवून स्थानिक नागरिकांना रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे गावातील आदिवासी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे.

मौजा तोडसा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली येथील “मा मा तलाव” परिसरात आयोजित कार्यक्रमात गावातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या पुरुष व महिलांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये मत्स्य बीज संवर्धनासाठी लागणारे साहित्य, मासे पकडण्यासाठी जाळी, खाद्य साहित्य तसेच उत्पादन वाढीसाठी आवश्यक साधनांचा समावेश होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मत्स्य व्यवसाय हा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उत्पन्नाचे प्रभावी साधन ठरू शकतो, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला उपसरपंच श्री. प्रशांत भाऊ आत्राम, ग्रामपंचायत तोडसा येथील पदाधिकारी, सौ. शांताबाई लिंग वेलदा , बचत गटाच्या अध्यक्षा, पाणी फाउंडेशनचे संचालक श्री. अशोक गावडे यांच्यासह लुला तिम्मा, राहुल दुर्वा, मिरवा गावडे, अनिल गावडे आदी उपस्थित होते. गावातील मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजातील युवक आणि महिलांनी पारंपरिक शेतीसोबत मत्स्य व्यवसायालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

पाणी फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे गावातील तलावांचा योग्य वापर होऊन स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे, मत्स्य व्यवसायातून कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळू शकते, त्यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यास मदत होणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. ग्रामीण भागात रोजगाराच्या मर्यादित संधी असताना अशा उपक्रमांमुळे युवकांना गावातच रोजगार उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.

यावेळी मत्स्य व्यवसायासंबंधी मार्गदर्शन सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. मत्स्य बीजांची काळजी, तलाव व्यवस्थापन, उत्पादन वाढविण्याच्या आधुनिक पद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध शंका उपस्थित केल्या. पाणी फाउंडेशनतर्फे भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबवून ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, अशी माहिती आयोजकांनी दिली.