अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली : तालुक्यातील मौजा हालेवारा, वट्टेगट्टा, कोठी, गट्टेपल्ली व हेटळकसा या पाच गावांमध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या आदिवासी नागरिकांची आगामी जनगणनेत स्वतंत्रपणे ख्रिश्चन धर्मामध्ये नोंद करण्यात यावी आणि त्यांना अनुसूचित जमातींसाठी लागू असलेल्या आरक्षण व विविध शासकीय सवलतींचा लाभ देणे बंद करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक आदिवासी बांधवांकडून शासनाकडे आज दिनांक 11/05/2026 रोजी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदार तसेच गट विकास अधिकारी यांच्या मार्फत संबंधित प्रशासनाकडे पाठविण्यात आले असून या विषयामुळे परिसरात सामाजिक व प्रशासकीय स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मौजा हालेवारा आणि लगतच्या काही गावांमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक आदिवासी नागरिकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. धर्मांतरानंतर संबंधित नागरिकांच्या पूजा पद्धती, धार्मिक आचरण, सामाजिक परंपरा आणि सांस्कृतिक जीवनशैलीत मोठा बदल झाला असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र असे असतानाही अनेक व्यक्ती शासकीय कागदपत्रांमध्ये स्वतःची नोंद अनुसूचित जमाती प्रवर्गातच ठेवून आदिवासी आरक्षणाचा लाभ घेत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या मते, भारतीय संविधानानुसार अनुसूचित जमाती समाजाला सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागासलेपण लक्षात घेऊन विशेष आरक्षण आणि विविध योजना लागू करण्यात आल्या आहेत. आदिवासी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे संरक्षण आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मात्र धर्मांतर करून वेगळ्या धार्मिक व्यवस्थेचा स्वीकार केलेल्या व्यक्तींनाही समान आरक्षणाचा लाभ मिळत असल्याने मूळ पारंपरिक आदिवासी समाजातील युवक-युवतींवर अन्याय होत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती, निवास योजना तसेच विविध शासकीय लाभांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असताना धर्मांतरित नागरिकांमुळे स्पर्धा अधिक वाढत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आदिवासी संस्कृती, देवपूजा, परंपरा आणि रूढी जपणाऱ्या समाजाला अनेकदा संधींपासून वंचित राहावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
तसेच आगामी जनगणनेदरम्यान प्रत्येक नागरिकाच्या धर्माची अचूक नोंद करणे बंधनकारक करावे, ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या नागरिकांची स्वतंत्रपणे ख्रिश्चन धर्मीय म्हणून नोंद करावी आणि त्यांना अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचा लाभ देण्याबाबत शासनाने स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी शासनाकडे आदिवासी समाजाची सांस्कृतिक ओळख आणि पारंपरिक श्रद्धा जतन करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अनेक गावांमध्ये धर्मांतरामुळे सामाजिक मतभेद निर्माण होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्या मार्फत प्रशासनाकडे पाठविण्यात आलेल्या या निवेदनामुळे एटापल्ली तालुक्यात धर्मांतर, आदिवासी आरक्षण आणि सामाजिक ओळख या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







