अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली :तालुक्यातील ग्रामपंचायत मेंढरी अंतर्गत येणाऱ्या ओडसा टोला येथे गेल्या जवळपास वर्षभरापासून वीज ट्रान्सफॉर्मर निकामी अवस्थेत असल्याने संपूर्ण वस्ती अंधारात आहे. या दीर्घकालीन समस्येमुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून तात्काळ वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ग्रामस्थांनी एटापल्ली येथील वीज वितरण कार्यालयाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. वीजपुरवठा खंडित असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून, मोबाईल चार्जिंगपासून ते घरगुती कामांपर्यंत सर्वच बाबींमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच शेतीसह इतर उपजीविकेच्या साधनांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी ओडसा टोला येथे भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित विभाग व प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
विशेषतः महिलांना या समस्येचा मोठा फटका बसत आहे. अंधारामुळे रात्रीच्या वेळी स्वयंपाक, घरकाम करताना अडचणी येत असून सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, खराब ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करून किंवा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून ओडसा टोला येथे वीजपुरवठा सुरू करावा, अशी ठाम मागणी ग्रामस्थांसह भाकपाकडून करण्यात आली आहे. प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.







