लॉयड्स मेटल्सतर्फे महा-रक्तदान शिबिर: ७७७ दात्यांचा विक्रमी सहभाग,कंपनीचे MD बी. प्रभाकरन यांचे प्रेरणादायी रक्तदान

144

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी एटापल्ली

एटापल्ली/सुरजागड : सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सीएसआर शाखा, लॉयड्स इन्फिनिटी फाउंडेशनतर्फे कोनसरी व सुरजागड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिक व कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तब्बल ७७७ युनिट रक्त संकलित करण्यात आले. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या ५०१ दात्यांच्या संख्येला मागे टाकत यंदाच्या शिबिराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांनी स्वतः पुढाकार घेत प्रथम रक्तदान केले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. “रक्तदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा आहे. एका छोट्याशा कृतीतून आपण कोणाचातरी जीव वाचवू शकतो. अशा उपक्रमांमुळे समाजातील एकोपा आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होते,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

शिबिरात कंपनीच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अनेकांनी प्रथमच रक्तदान करून समाजसेवेच्या या उपक्रमात सहभाग घेतला. शिबिराचे सुयोग्य नियोजन, वैद्यकीय पथकाची तत्पर सेवा आणि सुरक्षिततेची घेतलेली काळजी यामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.

लॉयड्स मेटल्स ही संस्था केवळ औद्योगिक क्षेत्रापुरती मर्यादित न राहता सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत असल्याचे या शिबिरातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

भविष्यातही समाजहिताच्या दृष्टीने विविध आरोग्य, शिक्षण व सामुदायिक विकासाच्या योजना राबविण्याचा कंपनीचा मानस असून, अशा मानवतावादी उपक्रमांतून समाजाशी असलेली बांधिलकी अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यवस्थापनाने व्यक्त केला.