कर्रेम येथील जि.प. प्राथमिक शाळेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आकस्मिक भेट; कामकाजाचे कौतुक

481

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : तालुक्यातील कर्रेम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सुहास गाडे यांनी आकस्मिक भेट देत शाळेच्या विविध घटकांची सखोल पाहणी केली. या भेटीदरम्यान शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांची स्थिती समाधानकारक असल्याचे आढळून आल्याने त्यांनी शाळेच्या एकूण कामकाजाचे कौतुक केले.

या अचानक झालेल्या भेटीमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. मा. गाडे यांनी शालेय परसबाग, स्वयंपाकगृह, बालभवन, स्वच्छतागृह तसेच संपूर्ण शालेय परिसराची बारकाईने तपासणी केली. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेबाबतही त्यांनी माहिती घेतली. तसेच शाळेतील स्वच्छता, शिस्त व शैक्षणिक वातावरणाबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अभ्यासाबाबत, उपस्थितीबाबत आणि भविष्यातील उद्दिष्टांबाबत माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने दिलेली उत्तरे पाहून त्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. शिक्षकांनी केलेल्या मेहनतीचेही त्यांनी अभिनंदन करत शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्य राखण्याच्या सूचना दिल्या.

या भेटीदरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार , प्रकल्प संचालक काळभोर , गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे, सहाय्यक गटविकास अधिकारी पेंदाम , सहाय्यक प्रशासन अधिकारी मडावी यांची उपस्थिती होती. तसेच ग्रामपंचायत गुरपल्लीचे प्रशासक कैलास उसेंडी, ग्रामपंचायत अधिकारी संध्या गेडाम, प्रशासकीय सदस्य दशरथ अडगोपुलवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष मडावी यांच्यासह इतर पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आकस्मिक भेटीमुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजाला अधिक चालना मिळाली असून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या अशा भेटींमुळे शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यास मदत होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. कर्रेम येथील या शाळेने ग्रामीण भागातही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या दिशेने उचललेले पाऊल प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.