शैक्षणिक विकास आणि जनसेवा शेवटच्या श्वासापर्यंत करू”– माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज राजे धर्मराव विद्यालय,सिरोंचा येथे पालक संपर्क मेळावा उत्साहात संपन्न.

170

*सिरोंचा :* येथील राजे धर्मराव विद्यालय तर्फे पालक संपर्क मेळावा व विद्यार्थी संवाद कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.याच कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक श्री.रमणजी कोम्मेरा यांचा सत्कार सोहळाही पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांची उपस्थिती लाभली.तसेच प्राचार्य गणेश तगरे,माजी शिक्षक,माजी मुख्याध्यापक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी राजे साहेबांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

यावेळी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजे अम्ब्रीशराव महाराज म्हणाले की,“धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना कै.श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती व सामाजिक सेवा घडवून आणण्यासाठी केली.त्यानंतर कै.श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांनी त्याचा विस्तार केला.आम्हीही शैक्षणिक विकास आणि जनसेवा हा महामंत्र जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जोपासत राहू.”

पुढे ते म्हणाले की,राजे धर्मराव विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश तगरे यांचे नियोजन,शिस्त आणि प्रामाणिकता यामुळे शाळा प्रगतीपथावर आहे.पालकांनी शाळेवरील विश्वास कायम ठेवावा तसेच कोणतीही समस्या असल्यास मुख्याध्यापकांकडे मांडावी,तिचे निवारण करण्यात येईल,असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी राजे साहेबांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक रमणजी कोम्मेरा यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य गणेश तगरे यांनी केले.
या कार्यक्रमाला पालक,विद्यार्थी,शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.!