दिनांक : १२ मार्च २०२६
📍 अहेरी : गडबामणी
अहेरी तालुक्यातील गडबामणी येथे जय पेरसापेन मंडळ, गडबामणी यांच्या वतीने क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती तसेच सल्लागांगरा स्मृती उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर सल्लागांगरा स्मृतीचे उद्घाटन करण्यात आले तसेच क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी पारंपरिक आदिवासी वाद्ये व गोंडी नृत्यांच्या माध्यमातून भाग्यश्रीताई आत्राम यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. 🌿
या कार्यक्रमाला नगरसेवक अमोलजी मुक्कावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवासजी विरगोनवर, पोलीस पाटील आनंदराव सुनतकर, आनंदराव मडावी, सुरेशजी पेंदाम, नामदेवजी दब्बा, मल्लाजी सिडाम, ईश्वरजी सिडाम, प्रभाकरजी कुसराम, रमेशजी कुसराम, अमोलजी रामटेके, अनुरागजी बेझुलवार, सुमितजी मोतकुरवार, पुष्पाताई दब्बा, मनिषाताई आलाम, प्रतिमाताई मडावी, शोभाताई सिडाम यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव-भगिनी, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) म्हणाल्या की, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके हे आदिवासी समाजाच्या शौर्य, स्वाभिमान आणि संघर्षाचे प्रतीक आहेत. आजही समाजात अज्ञान, अन्याय व भेदभाव अस्तित्वात आहेत. जर आपण खरोखरच वीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन करायचे असेल, तर शिक्षण, एकता आणि सामाजिक न्यायासाठी उभे राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच युवकांना संदेश देताना त्यांनी सांगितले की, युवा पिढीने मोबाईल आणि सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी कार्य केले पाहिजे. इतिहास नेहमी त्यांचाच लिहिला जातो जे समाजासाठी निस्वार्थपणे उभे राहतात, असेही त्या म्हणाल्या.
जयंतीनिमित्त समाजाला जागृत करण्याचा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा तसेच शिक्षण व प्रगतीच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. हीच क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. ✊🌿
कार्यक्रमाच्या शेवटी सुंदर असे गोंडी पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले.







