दुर्गम भाग आलदंडी येथे ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत पोलीस दलाचे मोफत आरोग्य शिबिर; २८४ नागरिकांची तपासणी

168

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलातर्फे ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत पोमके आलदंडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिराला पोमके हेडरी, पोमके बुर्गी व पोमके आलदंडी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण २८४ नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, त्वचारोग, श्वसनाचे विकार तसेच इतर सर्वसाधारण आजारांची तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार देण्यात आले. गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असलेल्या सुमारे ६० नागरिकांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. याशिवाय नागरिकांना आरोग्य, स्वच्छता व पोषण विषयक मार्गदर्शन देण्यात आले तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती समजावून सांगण्यात आली.

पोलीस दलाच्या दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत राबविण्यात येणारे हे शिबिर सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. शालिनीताई मेघे रुग्णालयातील डॉ. गगन गायकवाड, डॉ. मयूर नागोसे (नेत्ररोग तज्ज्ञ), डॉ. श्रीनिवास त्रिवेदी व डॉ. राहुल कुमार (फिजिशियन) यांनी रुग्णांची तपासणी करून वैद्यकीय सल्ला दिला. दुर्गम भागात आरोग्य सुविधा मर्यादित असल्याने अशा शिबिरांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. अनेक रुग्णांनी प्रथमच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते न राहता समाजहिताचे उपक्रम राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.

गडचिरोली पोलिसांनी सन २०२१ पासून आतापर्यंत १८० आरोग्य मेळाव्यांद्वारे तब्बल ४०,४७५ नागरिकांची तपासणी केली आहे. पाच रक्तदान शिबिरांमधून ४,३६२ युनिट रक्त संकलित करण्यात आले असून ऑपरेशन रोशनी अंतर्गत ९,९७१ नागरिकांची नेत्रतपासणी आणि १,४१२ मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. या व्यापक कामगिरीमुळे पोलीस दलाचा समाजाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित होत आहे.

या शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक श्री. गोकुल राज, पोलीस उप-अधीक्षक श्री. विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. योगेश रांजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पोस्ट आलदंडीचे प्रभारी अधिकारी सापोनि. अमोल भोसले, पोमके हेडरीचे सापोनि. पद्मसिंग दुल्हत , बुर्गीचे पोउनि. विकास शिरकुळे तसेच पोउनि ईश्वर सुरवसे व कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वीरित्या पार पाडले. नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउनि. चंद्रकांत शेलके व त्यांच्या पथकाने शिबिराच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष परिश्रम घेतले.