एटापल्ली | दिनांक 23 फेब्रुवारी 2026 मध्यरात्रीचा संशयास्पद अपघात; तरुणी ठार, दोघे गंभीर — धडक देऊन वाहन फरार

1306

उप संपादक: तेजेश गुज्जलवार

एटापल्लीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तुमरगुंडा गावाजवळ आलदंडी मार्गावर रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास भीषण दुचाकी अपघात घडून एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. मात्र हा अपघात नेमका कसा घडला याबाबत आता संशयाची धुके दाटू लागले आहे.
माहितीनुसार, मोटारसायकल क्रमांक MH 33 AG 3402 ही गाडी परसालगोंडी येथून दोन तरुणींना घेऊन जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला घसरून खाली कोसळल्याचे प्राथमिक सांगितले जात आहे. या अपघातात कु. बनी मैनु दुर्वा (वय 27 वर्षे) हिचा जागीच मृत्यू झाला. कु. मीना सैनु दुर्वा (वय 20 वर्षे) ही गंभीर जखमी असून तिच्यावर हेड्री येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालक रुपेश गावडे (वय 27 वर्षे) हाही गंभीर जखमी असून त्याला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, रात्री 12 वाजताच्या सुमारास निर्जन रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. दुचाकी स्वतः घसरून पडली की एखाद्या अज्ञात वाहनाने धडक देऊन फरार झाला? असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी इतर वाहनाचे काही पुरावे आहेत का, सीसीटीव्ही अथवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत का, याबाबत नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत.
मृतक कु. बनी मैनु दुर्वा हिचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे करण्यात आले असून अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. घटनेचा पुढील तपास उपपोलीस निरीक्षक सुर्वे (पोलीस ठाणे आलदंडी) करीत आहेत.
हा अपघात की ‘हिट अँड रन’? याचे उत्तर पोलिस तपासातूनच समोर येणार असले तरी, मध्यरात्री घडलेल्या या संशयास्पद घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे.