देवरीत शिवजन्मोत्सवाचा उत्साहपूर्ण सोहळा…स्त्री सन्मानाच्या विचारांचा जागर – माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे प्रतिपादन.

48

*_कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेच्या २६ व्या वर्षातील भव्य आयोजनास मान्यवरांची उपस्थिती…_*
देवरी, जि. गोंदिया | दि. १९ फेब्रुवारी २०२६ :

कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था, देवरी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गेल्या २६ वर्षांपासून सातत्याने साजरा होणाऱ्या या परंपरेने यंदाही देवरी नगरीत राष्ट्रभक्तीचा जागर घडविला.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते उपस्थित होते. ध्वजारोहण आमदार संजयजी पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अशोकजी बांगर यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय गोंदिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक भामरे सर, नगराध्यक्ष संजयजी उईके, संस्थेचे अध्यक्ष तथा जेष्ठ नेते झामसिंगजी येरणे, उपनगराध्यक्षा प्रज्ञाताई संगिडवार,संस्था सचिव तथा जिल्हा महामंत्री अनिल येरणे, कृ.उ.बा.स.देवरीचे सभापती तथा सिडिसिसी बँक चे संचालक प्रमोदजी संगिडवार, कृ.उ.बा.स.संचालक यादवराव पंचमवार,थानेदार डांगे साहेब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रविण दहिकर, डॉ. कीर्ती लडा, कृष्णाताई येरणे तसेच प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, पालकवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती”
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. नेते म्हणाले,
“जगातील एकमेव राजा असा आहे, ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा उभारला नाही; तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या आधारावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती.”
त्यांनी पुढे नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेत स्त्री सन्मान हा केंद्रबिंदू होता. स्त्रियांच्या सुरक्षेला आणि सन्मानाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. आजच्या समाजानेही हा आदर्श स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

मा.खा.डॉ. नेते यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. ‘लाडकी बहीण योजना’, ‘बेटी बचाव बेटी पढाओ’, ‘सुकन्या योजना’ यांसारख्या उपक्रमांमुळे महिलांना नवी उभारी मिळत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
परंपरेचा अभिमान आणि संस्कारांची जोपासना
कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेने गेली २६ वर्षे शिवजन्मोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि सामाजिक मूल्यांची रुजवात केली आहे. या सातत्यपूर्ण उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी संस्थेचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अशोकजी नेते यांनी संस्थेला व उपस्थित सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत छत्रपतींच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले.
देवरीत संपन्न झालेला हा शिवजन्मोत्सव सोहळा प्रेरणादायी वातावरणात पार पडला आणि उपस्थितांच्या मनात स्वराज्याचा संदेश अधिक दृढ करून गेला.