ड्रॉइंग फॉर चॅरिटी’ अहेरी जिल्हा चित्रकला स्पर्धेत संस्कार पब्लिक स्कूलची आराध्या प्रथम

437

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली :‘ड्रॉइंग फॉर चॅरिटी’ अंतर्गत आयोजित अहेरी जिल्हा स्तरावरील चित्रकला स्पर्धेत वर्ग ५ ते ८ गटातून संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली येथील कु. आराध्या तुषार पवार हिने प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा तसेच परिसराचा नावलौकिक वाढविला आहे. या स्पर्धेत दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.

अहेरी येथील रिपब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित पारितोषिक वितरण समारंभात गटशिक्षणाधिकारी आयंचवार सर यांच्या हस्ते आराध्याला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, सन २०२४ मध्ये झालेल्या याच स्पर्धेतही आराध्याने प्रथम क्रमांक मिळविला होता. सलग मिळणाऱ्या यशामुळे तिच्या कलागुणांची आणि सातत्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

आराध्या ही सध्या संस्कार पब्लिक स्कूलमध्ये स्टुडंट चेअरमन म्हणून जबाबदारी पार पाडत असून तिची नवोदय विद्यालय, घोट येथेही निवड झालेली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा दासरवार, वर्गशिक्षक श्री. अंशुल मारगोनवार तसेच संस्कार संस्थेचे संस्थापक श्री. विजय सुंकेपाकवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

संस्कार पब्लिक स्कूलमध्ये नियमितपणे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा, शैक्षणिक उपक्रम व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे समाधान आराध्याचे वडील श्री. तुषार पवार यांनी व्यक्त केले. परिसरात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये संस्कार शाळेचे विद्यार्थी सातत्याने यश संपादन करीत असल्याचे हे यश अधोरेखित करते.