अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली :- एटापल्ली तालुक्यातील नागुलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत हेटलकसा गावात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामावर गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आले असून, या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व निकृष्ट दर्जा असल्याचा दावा करण्यात येत आहे. शासनाच्या नियमांनुसार कोणतेही विकासकाम सुरू करताना आवश्यक असलेला माहिती फलक (ना-फलक) कामाच्या ठिकाणी लावणे बंधनकारक असताना तो फलक मुद्दामहून लपवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे काम कोणत्या योजनेतून, किती निधीतून व कोणत्या कालावधीत करण्यात येत आहे, याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
भारतीय जनता पार्टीचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्री. प्रसाद चंद्रशेखर पुल्लूरवार यांनी ग्रामभेटीदरम्यान या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रत्यक्ष पाहणीत रस्त्याचे काम तांत्रिक निकषांना न जुमानता, अत्यंत हलक्या प्रतीच्या साहित्याचा वापर करून सुरू असल्याचे आढळून आले. वापरण्यात येणारे सिमेंट, खडी व वाळू यांचा दर्जा निकृष्ट असल्याने रस्त्याला लवकरच तडे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या कामाच्या ठिकाणी कोणताही अभियंता, पर्यवेक्षक किंवा संबंधित विभागाचा अधिकारी उपस्थित नसल्याचेही निदर्शनास आले. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप होत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही मोजमाप प्रक्रिया, तांत्रिक तपासणी किंवा गुणवत्ता चाचणी न करता काम घाईघाईत उरकण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ग्रामस्थांनी याबाबत चिंता व्यक्त करत सांगितले की, पावसाळा सुरू होण्याआधीच जर हा रस्ता उखडला, तर त्याची जबाबदारी कोणाची राहणार, हा गंभीर प्रश्न आहे. जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या निधीचा अशा प्रकारे गैरवापर होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
या प्रकरणी भारतीय जनता पार्टी, एटापल्ली तालुका यांच्या वतीने प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे की, सदर रस्त्याच्या कामाची तात्काळ तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्यात यावी. दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि निकृष्ट दर्जाचे काम रद्द करून नियमांनुसार व दर्जेदार काम नव्याने करण्यात यावे.
प्रशासन या आरोपांवर काय भूमिका घेते आणि संबंधित प्रकरणात पुढील कारवाई होते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.







