कुणाल कोवे यांना सामाजिक क्षेत्रातील ‘दर्पण रत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

331

गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात सातत्याने काम करणारे कुणाल कोवे यांना सामाजिक क्षेत्रातील ‘दर्पण रत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून या सन्मानाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

कुणाल कोवे हे अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद – गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून ग्रामीण भागातील युवक संघटन, महिला सक्षमीकरण, शिक्षणप्रसार, आरोग्य जनजागृती, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे काम करत आहेत. दुर्गम जंगल आणि डोंगराळ भागातील अनेक गावांत जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी संवाद साधत सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत.

कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता अन्नधान्य सहाय्य, औषध उपलब्धता, वैद्यकीय मदत, रक्त आणि प्लाझ्मा उपलब्ध करून देणे अशा विविध उपक्रमांतून अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे त्यांचे कार्य समाजात वेगाने पोहोचले.

युवकांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात पुढे आणण्यासाठी मार्गदर्शन करणे, व्यसनमुक्तीबाबत जागृती, पर्यावरण संवर्धन आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.

त्यांच्या लोकाभिमुख कार्याची दखल घेऊन त्यांना ‘दर्पण रत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

“माझे कार्य हे स्वार्थरहित, समाजकेंद्रित आणि जमिनीवरील खऱ्या गरजांवर आधारित आहे,” असे कुणाल कोवे यांनी सांगितले.

या सन्मानाने गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्याला नवी प्रेरणा मिळाल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.