एटापल्ली: तालुक्यातील कसनसूर परिसरातील नागरिकांनी आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध व्यक्त केला. मागील पंधरा वर्षांपासून मंजूर असलेले ३३/११ केव्ही नवीन उपकेंद्र अद्याप सुरू न झाल्याने ७० ते ८० गावांतील हजारो नागरिकांना दरवर्षी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच मागणीसाठी आज परिसरातील हजारो नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले.
कसनसूर येथील सर्व्हे क्रमांक १४६/१ या ठिकाणी उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध असूनही अद्याप प्रत्यक्षात बांधकाम सुरू झालेले नाही. सध्याच्या घडीला या भागाचा वीजपुरवठा एटापल्ली येथील उपकेंद्रावरून केला जातो. मात्र एटापल्ली हे ठिकाण सुमारे ५० किलोमीटर अंतरावर आहे. डोंगराळ व दुर्गम भौगोलिक परिस्थिती, पावसाळ्यातील झाडांची पडझड, वादळ-वाऱ्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी संपूर्ण परिसर अनेक महिने अंधारात बुडून जातो.
वीजपुरवठ्यातील या सततच्या खंडामुळे येथील नागरिकांचे शैक्षणिक, आरोग्यविषयक, कार्यालयीन तसेच दैनंदिन जीवनमानावर मोठा परिणाम होत आहे. ऑनलाईन शिक्षण, शासकीय कामकाज, व्यवसाय आदी क्षेत्रे ठप्प होतात. ग्रामीण व आदिवासी बहुल भागात अगोदरच मूलभूत सुविधा नाहीत. त्यात वीजपुरवठ्याच्या तुटवड्यामुळे हा परिसर विकासापासून अधिकच वंचित राहिला आहे.
आंदोलनकर्त्यांनी शासनाला इशारा दिला की, जर तातडीने कसनसूर येथे नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्राचे बांधकाम सुरू झाले नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन उभारले जाईल. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरीही अजूनही या भागातील नागरिकांना वीजसारखी मूलभूत सुविधा नाकारली जात आहे, हे शासनाचे अपयश असल्याचे आंदोलनात ठामपणे सांगण्यात आले.
कसनसूर व आसपासचे नागरिक अनेक वर्षांपासून उपकेंद्राची मागणी करत आहेत. परंतु शासनाचे आश्वासन प्रत्यक्षात उतरलेले नसल्याने लोकांच्या मनात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. आजच्या रस्ता रोको आंदोलनातून हा उद्रेक दिसून आला असून शासनाने त्वरित ठोस पावले उचलणे आवश्यक आहे, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.
वेनहारा इलाका आणि रोपी बरसा इलाका चे नागरिक उपस्थित होते
यात कोतुराम पोटावी अध्यक्ष
देविदास मट्टामी, सचिव
कमलाताई हेडो सरपंच कसनसुर
विलास कोंदामी
नितीन पदा
सुधाकर गोटा,राजू गोमाडी,
सुनील मडावी आदी सह हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते
*नाकर्त्या लोकप्रतिनिधींमुळे अंधारात जनतेचे जीवन; फक्त आश्वासनं, कृती शून्य!*
गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील लोकप्रतिनिधी नागरिकांना केवळ आश्वासनांचीच खैरात वाटत आहेत, पण प्रत्यक्ष कृती मात्र कोणीच करत नाही. त्यांच्या या नाकर्तेपणामुळे आणि बेफिकिरीमुळे सामान्य नागरिकांना रोजच्या रोज असह्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. अंधारात जगणं, शिक्षण ठप्प होणं, आरोग्यसेवा ठप्प होणं आणि जीवनमान विस्कळीत होणं या सर्वांचा थेट फटका जनतेला बसत असून शासन व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.