भंडाऱ्यात विद्यार्थ्यांचा छळ – AISF कडून मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलिस महासंचालकांकडे तक्रार १७ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन पार पडले; आठवड्यात कारवाई न झाल्यास आणखी तीव्र लढ्याचा इशारा

237

प्रतिनिधी//

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील पोलिसांच्या अँटी नक्षल स्कॉडने *ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF)* या ऐतिहासिक विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा छळ केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी घडलेल्या या घटनेविरोधात AISF गडचिरोली जिल्हा संयोजक कॉ. सुरज जककुलवार यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पोलिस महासंचालक यांना निवेदन देऊन तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन पार पडले असून, AISF ने त्याला सक्रिय समर्थन दर्शवले. संघटनेने स्पष्ट केले की विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील छळवृत्तीविरोधात सुरू असलेला लढा पुढे आणखी व्यापक स्वरूप धारण करेल.

### विद्यार्थ्यांना व कुटुंबियांना धमक्या

निवेदनात म्हटले आहे की, पोलिसांनी AISF संघटनेला *नक्षलवादी* ठरवत कार्यकर्त्यांचा छळ सुरु केला. कोणतेही अधिकृत आदेश नसताना विद्यार्थ्यांची व कार्यकर्त्यांची वैयक्तिक माहिती मागविण्यात आली. एवढ्यावरच न थांबता गावातील पोलीस पाटलांना विद्यार्थ्यांच्या घरी पाठवून त्यांच्या कुटुंबियांना धमकावण्यात आले. *“तुमची मुलगी नक्षलवादी संघटनेत काम करते, साहेबांनी तिचे आधार कार्ड मागवले आहे”* अशा शब्दांत धमक्या देऊन आधार क्रमांकाची मागणी करण्यात आल्याने विद्यार्थिनी व तिच्या कुटुंबीयांवर मानसिक दडपण आले. या कृतीमुळे परिसरात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

### ऐतिहासिक संघटनेला नक्षलवादी ठरविण्याचा निषेध

AISF या विद्यार्थी संघटनेने स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस, अरुणा असफ अली, बटुकेश्वर दत्त, इंद्रकुमार गुजराल, कर्पुरी ठाकूर यांसारखे दिग्गज नेते या संघटनेतून घडले. आजही ही संघटना देशभरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे. अशा ऐतिहासिक आणि लोकशाही मूल्यांशी बांधील संघटनेला नक्षलवादी ठरविणे ही लोकशाहीला तडा देणारी आणि अतिशय निंदनीय बाब असल्याचे AISF ने म्हटले आहे.

### जनसुरक्षा विधेयकावर टीका

विद्यार्थ्यांचा छळ हा *जन सुरक्षा विधेयका*चे थेट दुष्परिणाम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या विधेयकाचे नाव ‘जनसुरक्षा’ असले तरी प्रत्यक्षात याचा वापर लोकशाहीवादी हक्क मागणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी होत असल्याचा आरोप संघटनेने केला. भंडारा जिल्ह्यातील गुन्हेगारी, अवैध दारू व गांजा विक्री, रेती तस्करी याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असताना समाजासाठी कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांवर छळनीती अवलंबली जात आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

### ठाम मागण्या

AISF ने पुढील ठाम मागण्या केल्या आहेत :
१) जनतेची गळचेपी करणारे जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करावे.
२) धमकी देणारे पोलीस कर्मचारी श्री. संदीप रहांगडाले व संबंधित पोलीस पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी.
३) भंडारा पोलिसांनी संघटनेची लेखी माफी मागावी.
४) सर्व पोलिसांना विद्यार्थी संघटनांविषयी योग्य समुपदेशन देण्यात यावे, जेणेकरून डावे-उजवे, मार्क्सवादी आणि माओवादी यातील मूलभूत फरक त्यांना समजू शकेल.
५) भविष्यात विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबियांवर छळात्मक किंवा भीतीदायक वागणूक होणार नाही याची शासन हमी द्यावी.

### राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

कॉ. सुरज जककुलवार यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, १७ सप्टेंबर रोजी झालेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील लढा आणखी तीव्र करण्यात येईल. शासनाने एका आठवड्यात ठोस कारवाई केली नाही, तर AISF राज्यभरात आणखी व्यापक आंदोलन उभारेल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन व भंडारा जिल्हा पोलिस प्रशासनाची असेल.