१५.ऑगस्ट देशभक्तीपर गीतांनी साजरा करा – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे *स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना विविध उपक्रम आयोजनाच्या सूचना

234

• जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक तहकूब

गडचिरोली, दि. ७ ऑगस्ट (जिमाका) :
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायती सादर करून उत्साहात स्वतंत्र दिन साजरा करण्याचे व या कार्यक्रमांमध्ये स्थानिक नागरिक व पालक यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहावी, यासाठी शाळांनी योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शालेय कार्यक्रमांदरम्यान राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायन बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक आणि मूलभूत सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देताना त्यांनी शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छ व सुसज्ज स्वच्छतागृह, शालेय इमारतींची दुरुस्ती किंवा नव्या इमारतींचे बांधकाम, ई-सुविधा आणि संगणक लॅब, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि खेळाचे मैदान या क्षेत्रांमध्ये लक्ष देण्याचे निर्देश दिले

या सुविधा उभारण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR Fund) मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

आज गडचिरोली जिल्हा परिषद सभागृहात नियोजित असलेल्या जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीसाठी ते उपस्थित होते. मात्र गडचिरोली-आरमोरी मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात चार युवकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर, मंत्री दादाजी भुसे यांनी शोक व्यक्त करत ही बैठक तहकूब केली. त्यांनी जाहीर केले की, या बैठकीचा आढावा पुढील दौऱ्यात घेण्यात येईल.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे व बाबासाहेब पवार तसेच सर्व विस्तार अधिकारी व जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.