एटापल्ली:
एटापल्ली-आलापल्ली मुख्य मार्गावर असलेला जुना पूल खचल्याने आणि नवीन पुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या गंभीर परिस्थितीसाठी कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी थेट जबाबदार असल्याचा आरोप आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जुना पूल दीर्घकाळापासून जीर्णावस्थेत होता. त्याच्या दुरवस्थेची माहिती संबंधित विभागाला असूनही नवीन पुलाचे काम संथगतीने सुरू होते. काम चालू असतानाही कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचा पर्यायी रस्ता बनविला होता. काल झालेल्या जोरदार पावसात हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला. परिणामी एटापल्ली-आलापल्ली मुख्य मार्ग बंद झाला असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
*जबाबदार कोण?*
नागरिकांनी थेट सवाल केला आहे की, “पूल वेळेत का पूर्ण झाला नाही? पर्यायी रस्ता मजबूत का केला नाही? यामुळे होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण?” आज रुग्ण, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी आणि सामान्य नागरिक यांचे जीवन अडचणीत आले आहे. आपत्कालीन सेवा ठप्प झाली आहे. एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे.
*कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी*
ही संपूर्ण परिस्थिती कंत्राटदाराच्या हलगर्जीपणा आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कामकाजाचे परिणाम आहेत. नागरिकांनी जोरदार मागणी केली आहे की, अपूर्ण पुलाच्या कामाबाबत तातडीने चौकशी करून संबंधित कंत्राटदार आणि देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. दोषींवर फौजदारी स्वरूपात गुन्हे दाखल करावेत आणि यापुढे अशा निष्काळजीपणा होणार नाही याची हमी द्यावी.
“आम्हाला आश्वासन नको, कारवाई हवी,” असा थेट इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.







