पुन्हा एकदा सुरजागडच्या ट्रक ने अपघात

797

_परसलगोंदीजवळ भीषण अपघात – सुरजागडहून परत येणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यू; अपघातानंतर पुरावे पुसण्याचा प्रयत्न?_

एटापल्ली.

तालुक्यातील रस्त्यांवरील जीवघेणे प्रवास थांबण्याचे नाव घेत नाही. काल दिनांक १५ जून २०२५ रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास, परसलगोंदी गावाजवळ एक दुर्दैवी अपघात घडला असून त्यात उमेश मंगु लेकामी (वय २२, रा. बुर्गी – कांदोळी) या युवकाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश हा सुरजागड येथून आपल्या गावाकडे बाईकने परत येत असताना, परसलगोंदी गावाजवळ लॉयड मेटल कंपनीच्या ट्रकने त्याच्या बाईकला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की उमेश रस्त्याच्या मध्यभागीच कोसळून जागीच प्राणास मुकला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेतली आणि मयत उमेशला रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान रुग्णालयात पोहचण्याच्याच आधी त्याची प्राण ज्योत मावळली

विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर संशयित ट्रक चालक व त्याच्या सहकाऱ्यांनी रातोरात अपघातस्थळ स्वच्छ करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी माहितीही समोर येत आहे.

घटनास्थळाजवळ मोटारसायकल किंवा ट्रक हे दोन्ही वाहन न आढळल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ट्रकचा क्रमांक, बाईकचा स्थिती आणि अपघाताची नेमकी कारणमीमांसा याबाबत अजूनही कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. यामुळे या घटनेभोवती संशयाचे सावट निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिक आणि युवकांच्या संघटनांनी या अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. सुरजागड परिसरात लोखंड वाहतूक करणाऱ्या ट्रकचे बेकायदेशीर व बेदरकार वाहतुकीमुळे वारंवार अपघात घडत आहेत, ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

पोलीस प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असून ट्रक व चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, उमेशच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.