विकास कामांत अवैध रेती, मुरुमाचा अवलंब! – आलापल्ली वनविभागातील प्रकार

59

अहेरी :शासनामार्फत जिल्हा विकासासाठी रस्ते तसेच पुल निर्मितीकरिता करोडो रुपयांचा निधी मंजूर केला असून याअंतर्गत कंत्राटदारामार्फत सदर कामे सुरु आहेत. मात्र नदी पुल तसेच इतर विकास बांधकामात अवैधरित्या उत्खनन केलेल्या रेती व मुरुमाचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार आलापल्ली वनविभागांतर्गत विकास कामात दिसून येत आहे. यात वनविभागासह शासनाची शुद्ध फसवणूक केली जात असून या विकास कामांची सखोल चौकशी करुन संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करावी, अशी तक्रार मुख्य वनसंरक्षकांकडे करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अनेक विकासात्मक कामे सुरु आहेत. याअंतर्गत आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या भामरागड मार्गावरील बांडीया नदी पुलासह इतर रस्ते बांधकामाचा समावेश आहे. मात्र बांडिया नदी पुलिया कंत्राटदारासह इतर कंत्राटदारांनी वनविभागाची व शासनाची शुद्ध फसवणूक करीत जंगल व नाल्यातून पर्यावरणाची हाणी करीत अवैधरित्या रेती, मुरुमाचे उत्खनन करुन वापर केल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये पेरमिली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चंद्रा गावातील वनजमिनीवर अंदाजे 8 ते 9 हजार ब्रास मुरुम उत्खनन केल्याचे प्रत्यक्षदर्शनी निदर्शनास आले. तसेच आलापल्ली वनविभागाअंतर्गत येत असलेल्या क्षेत्रातील रस्ते व पुलाचे काम मंजूर क्षेत्रापेक्षा अधिक रुंदीमध्ये होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर कंत्राटदारांच्या संपूर्ण बांधकामावरील रेती, मुरुमाचे परवाने तपासून बांधकामात वापरलेल्या रेती, मुरुमाचे मोजमाप करुन दोषी कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करीत काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी मुख्य वनसंरक्षकांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.
बॉक्ससाठी…
आलापल्ली वनविभागाची प्रतिष्ठा मलीन
आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या मोसम, जव्हेली व आलापल्ली या ठिकाणी तीन वाघांची हत्या झाली असून अनेक वन्यजीव शिकारीचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी तीन वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, वनपाल यांचे निलंबनही झाले आहे. यातच या वनविभागात मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम, रेतीचे उत्खनन करुन रस्ते व पुल बांधकाम करण्यात आले आहे. आलापल्लीचे विद्यमान उपवनसंरक्षक यांच्या कार्यकाळात वनसंपदा तसेच खनिजसंपत्तीची प्रचंड हानी सुरु आहे. यामुळे आलापल्ली वनविभागाची प्रतिष्ठा मलीन होत आहे. यामुळे मुख्य वनसंरक्षकांनी सदर प्रकरणी स्वत: लक्ष घालून त्रयस्त समितीद्वारे चौकशी करावी, अशीही मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
बॉक्ससाठी…
या कामांवर प्रश्नचिन्ह
आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या घोट वनपरिक्षेत्रातील विक्री डेपोमध्ये अवैध मुरुम उत्खनन करुन रस्ते तयार करण्यात आले होते, चौकशीत ते स्पष्टही झाल्याने या प्रकरणी वनपरिक्षेत्राधिकारीसह वनपाल व वनरक्षकावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. असे असतांनाही सदर कामाची बिल काढण्यात आल्याची चर्चा आहे. एलचिल-वेलगूर-ताणबोडी रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या कामाची प्रत्यक्ष वनपरिक्षेत्राधिका-यांसह उपवनसंरक्षकांनी पाहणी केली होती. यात रस्त्याचे काम अधिक रुंदीमध्ये होऊनही कारवाई करण्यात आली नाही. आलापल्ली वनविभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजना व इतर योजनेतील सर्व कामावर वनजमिनीतील मुरुम, दगड व रेतीचा अवैधरित्या वापर करण्यात आले आहे. सदर कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने यास जबाबदार संबंधित कंत्राटदार व वनाधिका-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही ताटीकोंडावार यांनी तक्रारीतून केली आहे.

अहवाल मागितला; चौकशीअंती पुढील कार्यवाही
यासंदर्भात तक्रार आपणास प्राप्त झाली आहे. आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक यांचेकडून याप्रकरणी अहवाल मागितला आहे. सखोल चौकशीअंती पुढील कार्यवाही करण्यात येईल.
एस. रमेशकुमार, मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली वनवृत्त