वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना वनविभागाने घेतले ताब्यात.. वनगुन्हा दाखल…

334

 

एटापल्ली नजीक महाराष्ट्र व छत्तीसगड च्या वन विभागाने केली संयुक्त कारवाई

गडचिरोली:

एटापल्लीपासून दोन किमी अंतरावर जीवनगट्टा मार्गावर एका मोटारसायकलवर दोन व्यक्ती संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. सदर मोटारसायकलचा पाठलाग वन कर्मचाऱ्यांनी करीत त्यांना पकडले. त्यांच्याकडे प्लास्टिक पिशवीत वाघाचे कातडे आढळले. तेव्हा वन कर्मचाऱ्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व वनकायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. एक आरोपी एटापल्ली तर दुसरा आरोपी वासामुंडी येथील आहे. 29 नोव्हेंबर च्या मध्यरात्री ही
कारवाई महाराष्ट्र व छत्तीसगड वनविभाग यांच्या संयुक्त चमुव्दारे केली असून ताब्यात घेतलेल्या आरोपिंचे नावे
शामराव रमेश नरोटे, वय 30 वर्ष रा. वासामुंडी व अमजद खॉ अमीर खॉ पठाण, वय 37 वर्ष रा. एटापल्ली असे आहे. वनविभागाचे अधिकारी वाघाची शिकार नेमक्या कोणत्या परिसरात झाली याचा शोध घेत आहे.
कारवाईत आरोपीकडून वाघाची कातडी 1 नग, हिरोहोंडा मोटारसाईकल 1 नग, मोबाईल 3 नग असा मुददेमाल जप्त केला आहे.
या घटनेचा अधिक तपास भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेशकुमार मीना, सहायक वनसंरक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनात एटापल्लीचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सी. सी. भेडके करीत आहेत.