अहेरी उपविभागात गौण खनिज तस्करांवर ‘दंडूक’ – पंधरा दिवसात सात ट्रक्टर जप्त; कोट्यवधीचा दंड वसूल

173

अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती तसेच गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतूकीचे प्रमाण वाढले होते. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे प्रशासकीय स्तरावर अनेक तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीची दाखल घेत अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात उपविभागातील संबंधित तालुक्यात या तस्करांविरोधात दंडात्मक कारवाई आरंभली. याअंतर्गत मागील पंधरा दिवसात 7 ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्या असून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी एक कोटीच्या वर दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवांयामुळे गौण खनिज तस्करांचे धाबे दणाणले आहे.
अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या गौणखनिज उत्खनन व वाहतूक होती. यामुळे शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडत होता. यासंदर्भात वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे वरिष्ठ अधिका-यांपर्यंत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र स्थानिक प्रशासनाद्वारे कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासकीय अधिका-यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. या प्रकाराची अहेरी अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी गंभीर दखल घेत त्यांच्या अधिनिस्त विशेष भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली. या पथकाअंतर्गत ऑक्टोबर महिन्यात पंधरा दिवसाच्या कालावधीत अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी तब्बल 7 ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्या. यामध्ये अहेरी तालुक्यातील आलापल्ली, येलचिल, वांगेपल्ली, नागेपल्ली तसेच भामरागड तालुक्यातही दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये दंडात्मक स्वरुपात तब्बल 1 कोटी 90 लाख रुपये दंड स्वरुपात वसूल करण्यात आले. अहेरी अप्पर जिल्हाधिकारी भाकरे यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने राबविलेल्या गौण खनिज तस्करांविरोधातील या धडक कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे.
बॉक्ससाठी…
अप्पर जिल्हाधिका-यांनी फेटाळली अपील
भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे एका कंत्राटदारामार्फत अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा केल्या प्रकरणी स्थानिक प्रशासनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. याविरोधात संबंधित कंत्राटदाराने अपील सादर केली होती. मात्र अप्पर जिल्हाधिकारी भाकरे यांनी सदर अपील फेटाळीत संबंधित कंत्राटदारावर तब्बल 1 कोटी 2 लाख रुपये दंड वसुलीची कारवाई सुरु केली आहे. अप्पर जिल्हाधिका-यांच्या तस्करांविरोधातील या आक्रमक भूमिकेमुळे गौण खनिज तस्करांचे धाबे दणाणले आहे.
बॉक्ससाठी…
शासनाची दुशाभूल करणा-या प्रशासकीय कर्मचा-यांचे काय?
भामरागड तालुक्यातील येचली नदी घाटातून अवैधरित्या हजारो ब्रास रेतीचे उत्खनन व वाहतूक करुन ताडगाव येथे साठवणूक केल्याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा करीत वरिष्ठ स्तरापर्यंत तक्रार केली होती. याची दखल घेत वरिष्ठांनी संबंधित कंत्राटदारावर कोट्यवधीची दंडात्मक कारवाई केलेली कारवाई स्वागतार्ह्य आहे. मात्र सदर कारवाई पुरेशी नाही. या प्रकरणात संबंधित कर्मचारी तसेच अधिका-यांनी शासनाची दिशाभूल केली असल्याने त्यांचेवर निलंबनाची कारवाई होऊन कंत्राटदारास काळ्या यादीत टाकणे अगत्याचे आहे. तरच संबंधिताना धडा शिकविता येईल. त्यामुळे वरिष्ठांनी संबंधित कर्मचारी, अधिका-यांवर कारवाई करुन कंत्राटदारास काळ्या यादीत टाकावे अन्यथ न्यायालयात धाव घ्यावी लागेल.
संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते