लाहेरी : लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर हे आरोग्य केंद्र रामभरोसे झाले आहे. औषध निर्माण अधिकारी व प्रयोगशाळा तज्ञाच्या भरवशावर येथील कारभार सुरू आहे. सद्य:स्थितीत या आरोग्य केंद्रासाठी प्रभारी वैद्यकीय अधिकारी सुद्धा देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस येथील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. यानंतर सात दिवसांचा कालावधी लोटूनही लाहेरी आरोग्य केंद्राचा प्रभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला नाही. असा प्रकार सुरू असतानाच एखाद्या रुग्णाला कमी-जास्त झाल्यास जबाबदार कोण? वरिष्ठ अधिकारी अजूनही कुंभकर्णी झोपेत आहेत का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
लाहेरी आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांत मलेरिया पुन्हा डोकेवर करत असताना आरोग्य विभागातील महत्वाचे पद रिक्त आहे. आता जवळपास २० ते ३० रुग्ण सक्रिय आहेत, ही संख्या वाढू शकते. वेळीच उपाययोजना न केलास गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे या आरोग्य केंद्रावर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
चौकट : लाहेरी आरोग्य केंद्रात अतिदुर्गम भागातील रूग्ण येतात. काही वर्षापासून कामचलावूपणा सुरू आहेत. गैरहजर आहेत त्या डॉक्टरवर कारवाई करून कायमस्वरुपी डॉक्टर देण्यात यावे. पाच दिवसात कायमस्वरुपी डॉक्टरांची नेमणूक करावी, अन्यथा आरोग्य केंद्राला कुलूप ठोकणार.
– लक्ष्मीकांत बोगामी, माजी उपसपंच तथा काँग्रेस तालुकाध्यक्ष भामरागड
चौकट : समूदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहा ठिनगे यांना पत्राद्वारे पुढील आदेशापर्यंत आईपीडी, ओपीडी सांभाळण्याकरिता प्रभार दिला आहे. डॉ. संभाजी भोकरे हे काही दिवसांत रुजू होतील व आरोग्यसेवा सुरळीत होईल. मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसत असली तरी त्यांचे उपचार आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पूर्ण केले जात आहेत.
्र- डॉ. भूषण चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी भामरागड