अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली : दिनांक 08 एप्रिल 2026 रोजी सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी गुरूपल्ली ग्रामपंचायतीस आकस्मिक भेट देत विविध विकास कामांचा सखोल आढावा घेतला. या अचानक भेटीमुळे ग्रामपंचायत प्रशासनात चैतन्य निर्माण होऊन कामकाजाला गती मिळाल्याचे चित्र दिसून आले.
भेटीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांची पाहणी केली. गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन तेथील सुविधा, रुग्णसेवा व औषधसाठा याची माहिती घेतली. आरोग्य सेवांमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
गावातील विविध विकास कामांची पाहणी करताना रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली. बहुतांश कामे समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले, तर काही कामांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या भेटीप्रसंगी भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, काळभोर प्रकल्प संचालक जिल्हा परिषद गडचिरोली , आदिनाथ आंधळे गट विकास अधिकारी, पंचायत समिती एटापल्ली , पेंदाम सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती एटापल्ली , मडावी सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांच्यासह ग्रामपंचायत गुरूपल्लीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी कु. संध्या गेडाम व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच या प्रसंगी ग्रामपंचायत गुरूपल्लीचे प्रशासकीय समिती सदस्य दशरथ अडगोपुलवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सुहास गाडे तसेच उपस्थित सर्व अधिकारी वर्गांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
या आकस्मिक भेटीमुळे ग्रामपंचायत स्तरावर पारदर्शकता वाढून विकास कामांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.






