एटापल्लीत वीज कोलमडली; महावितरणचा बेजबाबदार कारभार; एटापल्लीत आंदोलनाची ठिणगी!

181

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १० व १२ मध्ये मागील चार दिवसांपासून वीजपुरवठ्याचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. दररोज रात्री वीज खंडित होण्याचा प्रकार सुरू असून, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) च्या निष्काळजी व बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाचा स्फोट झाला आहे.
रात्री लाईट जाते, दिवसा तात्पुरती जोडणी करून “काम भागवलं” जातं आणि पुन्हा रात्री अंधारात ढकललं जातं – हा प्रकार आता रोजचाच झाला आहे. विशेष म्हणजे, रात्री फोन करून तक्रार केली असता संबंधित अधिकारी व कर्मचारी फोन उचलण्याची तसदीही घेत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत “हा सरळ जनतेचा अपमान आहे” असा आरोप केला आहे.परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचा अंधारात अभ्यास
सध्या परीक्षेचा हंगाम सुरू असताना विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करावा लागत आहे. मेणबत्ती आणि मोबाईल लाईटच्या भरोशावर शिक्षण घेण्याची वेळ आली असून, यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.पाणीटंचाई आणि जनजीवन विस्कळीत
वीज नसल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. घरगुती उपकरणे वारंवार खराब होत असून, वृद्ध, लहान मुले व महिलांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ओव्हरलोडेड ट्रान्सफॉर्मर – मुख्य कारण स्पष्ट
प्राथमिक माहितीनुसार, एका डीपी ट्रान्सफॉर्मरवर क्षमतेपेक्षा अधिक भार टाकण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरची गरज वारंवार मांडूनही महावितरण प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.

नगरपंचायतीचे निवेदन, तरीही हलगर्जीपणा कायम
या गंभीर प्रश्नावर आज नगरपंचायतीतर्फे वीज विभागाला निवेदन देण्यात आले. मात्र, वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे. अधिकाऱ्यांचे नेहमीचेच उत्तर उपविभागीय अभियंत्यांनी सांगितले की, “अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरसाठी प्रस्ताव अल्लापल्ली कार्यालयाकडे पाठवला आहे, मंजुरी मिळताच काम सुरू करू.”
मात्र नागरिकांनी हे उत्तर धुडकावून लावत “ही केवळ वेळ मारून नेण्याची पद्धत आहे,” असे स्पष्ट म्हटले आहे.
आंदोलनाचा इशारा – ‘आता रस्त्यावर उतरणार!’
वीजप्रश्नाकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने नागरिक आता आक्रमक झाले असून, लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी सुरू झाली आहे.
“अंधारात जगायचं नाही, हक्काची वीज हवीच!” असा संतप्त सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.
संपूर्ण जबाबदारी महावितरणवरच!
या संपूर्ण प्रकाराला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) च जबाबदार असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली असून, तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.