अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली: तालुक्यातील पैडी गावासह जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून विशेषतः BSNL च्या टॉवरबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने गावोगावी मोबाईल टॉवर उभारून डिजिटल संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी या योजनेचा अपेक्षित फायदा होत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.ज्या गावांमध्ये खाजगी मोबाईल कंपन्यांचे टॉवर उभारलेले आहेत, तेथे मोबाईल सेवा सुरळीत सुरू असून नागरिकांना फोन कॉल, इंटरनेट सेवा, तसेच व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करण्यात कोणतीही अडचण येत नाही. मात्र, ज्या गावांमध्ये BSNL चे टॉवर आहेत, तेथे केवळ टॉवर दिसतात; प्रत्यक्षात नेटवर्क सेवा अत्यंत खराब असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
पैडी गावातील नागरिकांनी सांगितले की, टॉवरची रेंज इतकी कमी आहे की, गावातसुद्धा व्यवस्थित फोन लागत नाही. इंटरनेट सेवा तर पूर्णपणे ठप्पच आहे. गावाच्या हद्दीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर गेल्यावर नेटवर्क पूर्णपणे गायब होते. परिणामी, ऑनलाईन व्यवहार, शासकीय सेवा, तसेच दैनंदिन संवाद साधणेही कठीण झाले आहे.विशेष म्हणजे, टॉवर उभारण्यापूर्वी गावातील नागरिकांनी आपापल्या पद्धतीने मोबाईल सेवा कशीबशी वापरून काम भागवले. मात्र, टॉवर उभारल्यानंतर नागरिकांनी BSNL चे सिमकार्ड मोठ्या प्रमाणावर खरेदी केले, कारण नेटवर्क सुधारेल अशी अपेक्षा होती. परंतु, टॉवर सुरू असूनही सेवा न मिळाल्याने ग्रामस्थांची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
गेल्या आठ दिवसांतील परिस्थिती तर अधिकच गंभीर झाली आहे. गावात एखादी आपत्कालीन घटना घडल्यास, जसे की मृत्यू झाल्यास, तात्काळ संपर्क साधण्यासाठी फोनही लागत नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाबद्दल संताप वाढत आहे.दरम्यान, गावातील पुढारी नितीन पदा यांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधत खाजगी मोबाईल कंपनीचा टॉवर उभारण्याची ठोस मागणी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “गावकऱ्यांना चांगली नेटवर्क सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे BSNL सेवा सुधारावी किंवा तत्काळ दुसऱ्या खाजगी कंपनीला परवानगी देऊन नवीन टॉवर उभारावा.”या पार्श्वभूमीवर पैडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन ठराव पारित केला असून, BSNL ऐवजी दुसऱ्या खाजगी कंपनीचा टॉवर उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांनाही तोंडी माहिती दिली आहे. कोटमी पोलीस मदत केंद्रातील सहायक प्रभारी अधिकाऱ्यांपर्यंतही ही समस्या पोहोचवण्यात आली आहे. तरीदेखील अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.ग्रामस्थांच्या मते, करोडो रुपये खर्च करून उभारलेले BSNL चे टॉवर केवळ शोभेपुरते उभे आहेत. यामध्ये कंत्राटदार आणि प्रशासनाकडून जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे.“आमचे म्हणणे खोटे असल्यास संबंधित BSNL कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावात येऊन प्रत्यक्ष चौकशी करावी,” असे खुले आव्हान ग्रामस्थांनी दिले आहे. आता या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि संबंधित विभाग किती गांभीर्याने लक्ष देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.







