एटापल्लीच्या नगरसेवकांनी वाचला खासदार किरसान यांचेकडे समस्यांचा पाढा! नगरपंचायतच्या अनागोंदी कारभाराच्या चौकशीची मागणी.

191

एटापल्ली :- गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार डॉ नामदेव किरसान यांची एटापल्ली नगरपंचायतच्या नगरसेवकांनी भेट घेऊन तालुक्याच्या विविध समस्या सोडविण्याची आणि नगरपंचायत प्रशासनातील अनागोंदी कारभाराच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

एटापल्ली तालुका आदिवासी बहुल व मागास असून देश स्वातंत्र्याच्या पंचांहात्तर वर्षानंतरही शासनाकडून पन्नास ते साठ गाव खेड्यांना जोडणारे रस्ते निर्माण करण्यात आले नाहीत, मुख्य रस्त्याची दुरावस्था झाल्याचे निदर्शन नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने खासदार किरसान यांच्या भेटी दरम्यान नोंदविले आहे. यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी प्रणय तांबे यांच्या मनमानी व अनागोंदी कारभार केल्या जात असल्याची तक्रार खासदार किरसान यांच्याकडे नगरसेवक मनोहर बोरकर, निजान पेंदाम, किसन हिचामी, व काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.

आरोग्य, शिक्षण, पिण्याचे शुद्ध पाणी नागरी वस्त्यांमध्ये मूलभूत व भौतिक सोयीसुविधांची निर्मिती मागणीही यावेळी करण्यात आली आहे. अशा विविध समस्यांवर नगरसेवक मनोहर बोरकर, निजान पेंदाम, किसन हिचामी, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश मुप्पलवार व राकेश समुद्रालवार यांनी केली आहे. शिष्टमंडळशी बोलतांना खासदार डॉ नामदेव किरसान यांनी समस्यांचा पाठपुरावा शासन दरबारीं करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यावेळी आमदार रामदास मसराम, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.