अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली :- एटापल्ली शहरात बेकायदेशीर सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या तस्करांविरोधात पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत तस्करीचे जाळे उघडकीस आणले आहे. दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी एटापल्ली पोलिसांनी अंडा चौक परिसरात सापळा रचून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा ‘मजा’ ब्रँडचा सुगंधित तंबाखू जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात अवैध तंबाखू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
छत्तीसगड राज्यातील छातीसगड येथून एटापल्लीकडे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या सुगंधित तंबाखू आणला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून अंडा चौक परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित मोटारसायकल क्रमांक CG 19 T 8317 दिसताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला. काही अंतरावर वाहन अडवून तपासणी केली असता मोटारसायकलवरून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी रमेश हिरा व देवव्रत सिकदर या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत हा तंबाखू एटापल्लीतील एका व्यापाऱ्याला पुरवठा करण्यासाठी आणला जात असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. संबंधित व्यापारी कोण आहे, याबाबत सध्या शहरात चर्चा सुरू असून पोलिसांकडून याची सखोल चौकशी केली जात आहे.
सदर कारवाईदरम्यान पोलीस कर्मचारी चंद्रशेखर शेकुर्तिवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पाठलाग करून मुद्देमाल व वाहन जप्त करण्यात यश मिळवले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीराम जी. मडावी करीत असून, तस्करीमागे नेमके कोणते जाळे कार्यरत आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
एटापल्ली परिसरात अल्पवयीन व तरुणांमध्ये व्यसन वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या सुगंधित तंबाखूविरोधात पोलिसांनी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह मानले जात असून, येत्या काळात आणखी कारवाया होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे तंबाखू तस्करांच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढे आणखी धक्कादायक नावे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.







