अहेरी:
राजकीय बळ, दबाव आणि ओळखींचे कवच अखेर कायद्यापुढे गळून पडले! गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची बेकायदेशीर चार मजली इमारत आज प्रशासनाच्या बुलडोझरखाली आली. अहेरी नगर पंचायतीने कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरू केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
*न्यायालयानेच ठोठावली ‘हातोडा’ मारण्याची परवानगी*
अहेरीजवळील गडअहेरी परिसरात उभारण्यात आलेल्या या इमारतीबाबत नियमबाह्य बांधकाम, मंजुरीपेक्षा जादा मजले आणि नगर रचना कायद्याचे गंभीर उल्लंघन झाल्याच्या तक्रारी होत्या. अहेरी नगर पंचायतीने यापूर्वीच नोटिसा बजावून कारवाईचा स्पष्ट इशारा दिला होता.
प्रकरण न्यायालयात गेले, मात्र दिवाणी न्यायालयाने “बेकायदेशीर बांधकामाला संरक्षण देता येत नाही” असा ठाम निर्वाळा देत तात्पुरता मनाई हुकूम नाकारला. अपीलसाठी दिलेली मुदत संपताच आज प्रशासनाने थेट तोडकामाची कारवाई सुरू केली.
*बुलडोझर, पोलीस बंदोबस्त आणि प्रशासनाचा कडक संदेश*
आज सकाळपासून जड यंत्रसामग्री, मोठ्या संख्येने पोलीस दल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इमारतीचे पाडकाम सुरू आहे. राजकीय दबावामुळे ही कारवाई कधीच होणार नाही, अशी चर्चा रंगत होती. मात्र, न्यायालयाचा आदेश आणि शासनाच्या स्पष्ट भूमिकेमुळे प्रशासनाने कोणताही दबाव न जुमानता थेट कारवाई करत “कायदा सर्वांसाठी समान आहे” हा ठळक संदेश दिला आहे.
*राजकीय दबदब्याला उतरती कळा?*
एकेकाळी अहेरी परिसरात प्रभावशाली मानले जाणारे अजय कंकडालवार यांच्यासाठी ही कारवाई मोठा राजकीय धक्का मानली जात आहे. आधीच त्यांच्या प्रभावाला ओहोटी लागल्याच्या चर्चा असताना, आता थेट अवैध बांधकामावर बुलडोझर चालल्याने त्यांच्या राजकीय प्रतिमेला मोठी खीळ बसल्याचे बोलले जात आहे.
*जनतेतून सवाल इतर ‘अवैध’* बांधकामांचे काय?
या कारवाईनंतर आता जनतेतून एकच प्रश्न उपस्थित होत आहे—
जर कायदा सर्वांसाठी समान असेल, तर इतर राजकीय नेते व बड्या लोकांच्या अवैध बांधकामांवरही असाच हातोडा कधी चालणार?







