अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली :-आज दिनांक 29/01/2026 ला एटापल्ली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी संघटना व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात सौम्य, अभ्यासू आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची ओळख असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय अजितदादा पवार यांचे 28 जानेवारी २०26 रोजी विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने राज्याने एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व, तर जनतेने आपला हक्काचा नेता गमावला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, प्रशासनातील कार्यक्षमता आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या भरीव कार्याचा गौरव केला.
अजितदादा पवार हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे, कठोर निर्णय घेणारे आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. जलसंपदा, सिंचन, ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा, शेतकरी हिताचे निर्णय तसेच अर्थकारण मजबूत करण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय राज्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत.
विशेषतः दुष्काळग्रस्त भागांसाठी सिंचन प्रकल्पांना गती देणे, शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसंधारणाची कामे, तसेच उद्योग आणि रोजगारनिर्मितीसाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय हे त्यांच्या कार्यशैलीचे ठळक उदाहरण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रशासनावर मजबूत पकड, कामातील शिस्त आणि वेळेचे काटेकोर नियोजन ही अजितदादा पवार यांची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक जीवनात निर्माण झालेली पोकळी आजही भरून न निघणारी आहे. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून अनेक सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रम आजही प्रेरणा देतात. जनतेशी असलेला त्यांचा थेट संवाद, सामान्यांच्या प्रश्नांविषयीची आस्था आणि विकासासाठीची दूरदृष्टी हीच त्यांची खरी ओळख होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी हिचामी, मनीष दुर्गे, प्रसाद राजकोंडावार, अनिकेत हिचामी, विजय अतकमवार, राजू नरोटे, लक्ष्मण नरोटे, बेबीताई नरोटे, शैलेश श्रीरामवार, जनार्दन नल्लावार, नागेश जगन्नाथ, डॉ. सुरज गुप्ता, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश पुलूरवार, प्रशांत तेलकुंटलवार, अभि नागुलवार, पत्रकार संघतेनेचे अध्यक्ष रवी रामगुंडेवार, ओंकार मोहुर्ले, शिवसेनेचे अक्षय पुंगाटी, भाजपाचे विजय नल्लावार, यवन पुलके , अंकित वरगंटीवार, अनिल बुग्गावर आदी मान्यवर उपस्थित होते







