परधान समाजाच्या महिलांचा हळदी-कुंकवाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न

201

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली : दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी आदिवासी परधान समाजाच्या महिलांच्या वतीने हळदी-कुंकवाचा पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. समाजातील महिलांमध्ये एकोपा, स्नेह व सांस्कृतिक मूल्यांची जोपासना व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. कौशल्या काकु वरखडे उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले. महिलांच्या सामाजिक सहभागाबाबत बोलताना त्यांनी परधान समाजातील महिलांनी एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो तसेच समाजाची सांस्कृतिक ओळख अधिक बळकट होते, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन महिला संघटनेच्या पुढाकारातून करण्यात आले होते. यावेळी महिला अध्यक्ष सौ. वनिता पोरतेट, उपाध्यक्ष सौ. कौशल्याजी वरखडे, सचिव सौ. काजल सडमेक यांनी संयोजनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. तसेच सौ. सुमित्रा मडावी, सौ. विना मडावी, सौ. शांताबाई सिडाम, सौ. अहिल्याबाई कोडापे, सौ. भावणाताई मडावी, सौ. ममता ताई आत्राम यांच्यासह आदिवासी परधान समाजातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने महिलांचे औक्षण करण्यात आले. एकमेकींना हळद-कुंकू लावून शुभेच्छा देण्यात आल्या. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण परिसरात सणासुदीचे, आनंदी वातावरण निर्माण झाले होते. हळदी-कुंकवाच्या माध्यमातून महिलांमधील आपुलकी, स्नेह व नातेसंबंध अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

कार्यक्रमाच्या शेवटी आदिवासी परधान समाजाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सर्व उपस्थित महिला व मान्यवरांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे समाजातील महिलांमध्ये एकजूट व सहकार्याची भावना अधिक वृद्धिंगत झाली.

एकूणच आदिवासी परधान समाजाच्या महिलांनी आयोजित केलेला हा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सामाजिक सलोखा, सांस्कृतिक जपणूक आणि महिला सशक्तीकरणाचा उत्तम आदर्श ठरला असून, अशा उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.