अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी
एटापल्ली (गडचिरोली):
ग्रामीण भागातील गरीब शेतकरी, मजूर व आदिवासी जनतेला जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची आर्थिक लूट करणाऱ्या ‘सुविधा फार्मिंग अँड अलाईड लिमिटेड’ आणि ‘क्रिएटिव्ह इंडिया मल्टी स्टेट ॲग्रो पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ या कंपन्यांविरोधात तीव्र जनरोष उसळला आहे. या प्रकरणी संबंधित स्थानिक एजंटवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत , अशी ठाम मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकपा) केली आहे.
भाकपाचे तालुका अध्यक्ष कॉ. रमेश कवडो यांच्या नेतृत्वाखाली आज एटापल्ली तहसील कार्यालयात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनबसादर करण्यात आले.
एजंटांच्या माध्यमातून जनतेची फसवणूक
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित कंपन्यांनी आपले एजंट नेमून “कंपनी शासनमान्य आहे, सुरक्षित गुंतवणूक आहे” असे भासवत ग्रामीण जनतेचा विश्वास संपादन केला. या एजंटांनी शेतकरी व आदिवासी नागरिकांना गुंतवणुकीस भाग पाडले. मात्र कंपन्या अचानक बंद पडल्याने गुंतवणूकदारांचे मुद्दल व वायदा केलेला परतावा दोन्ही बुडाले*आहेत.
आज हेच एजंट जबाबदारी झटकत असून, पीडित नागरिकांना वाऱ्यावर सोडले जात आहे. त्यामुळे कंपनीचे संचालक, व्यवस्थापक तसेच संबंधित एजंट यांच्यावर फसवणूक व आर्थिक गुन्ह्यांतर्गत फौजदारी कारवाई*करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आदिवासी, शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट
या फसवणुकीमुळे अनेक गरीब कुटुंबांचे कष्टाने कमावलेले पैसे बुडाले असून, शेतकरी, मजूर व आदिवासी कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. ही केवळ खाजगी फसवणूक नसून, सरकारी नियंत्रण यंत्रणेच्या अपयशामुळे घडलेली आर्थिक लूट असल्याचे भाकपाने स्पष्ट केले.
पीडित नागरिकांची नावे
यावेळी पीडित नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात सादर केल्या.
त्यामध्ये सत्यनारायण पुज्जलवार, प्रतिमा जोरदार, कुमारेश जोरदार, संजय पुज्जलवार, आरती पुज्जलवार, जोसेफ बारावा, राजेश कुजूर, सुरेश कुजूर, जुलेश कुजूर व जगमा कुजूर यांचा समावेश आहे.
भाकपाचा इशारा – जनआंदोलन छेडणार
निवेदन देताना भाकपाचे तालुका सहसचिव कॉ. विशाल पुज्जलवार ,कॉ.सतू हेडो तसेच पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही, तसेच गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह परत मिळवून दिले नाहीत, तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनतेच्या न्यायासाठी तीव्र जनआंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला.







