रेगडी येथील दिना धरणाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्याची मागणी — शिवसेना जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांची ठाम भूमिका

204

चामोर्शी : चामोर्शी तालुक्याला जीवनदायी ठरलेले रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार जलाशय (दिना धरण) सध्या गाळाने भरले असून त्याची जलसाठा क्षमता अत्यंत घटली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांनी प्रशासनाकडे धरणाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्याची मागणी करत परिसराच्या विकासाची दिशा दाखवली आहे.

प्रशांत शाहा यांनी सांगितले की, “दिना धरण हे चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांच्या शेतीसाठीच्या सिंचनाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र अनेक वर्षांपासून धरणाचे खोलीकरण झाले नसल्याने गाळ साचून पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. परिणामी दुबार पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येते. दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई भासते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून धरणाचे खोलीकरण तातडीने करण्यात यावे,” अशी मागणी त्यांनी केली.

तसेच शाहा यांनी पुढे सांगितले की, “धरण परिसरात वृक्षारोपण, सिमेंट बेंच, फेरफटका मार्ग, तसेच मुलांसाठी खेळण्याची साधने उभारून येथे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची मोठी संधी आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि परिसराचा सर्वांगीण विकास होईल.”

स्थानिक ग्रामस्थांनी या मागणीला मोठा प्रतिसाद दिला असून, ‘दिना धरणाचे पुनरुज्जीवन म्हणजे रेगडीचा विकास’ असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यांनी प्रशासनाने तातडीने पावले उचलून शाहा यांच्या मागणीला मान्यता द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.