छल्लेवाडा येथे स्पार्कलीफ फाउंडेशन तर्फे करिअर मार्गदर्शन सत्र

219

प्रतिनिधी//

छल्लेवाडा- २३ ऑक्टोबर: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे स्पार्कलीफ फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर करिअरविषयक योग्य दिशा मिळावी, हा उद्देश लक्षात घेऊन छल्लेवाडा समाज मंदिर/ पंचशील बौद्ध विहार येथे हे सत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे 60 ते 70 विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि गावातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नेतृत्व स्पार्कलीफ फाउंडेशनचे संस्थापक संपत दुर्गे आणि सचिव मोहन देवगडे यांनी केले. सदस्य शंकर झाडे, प्रफुल बोरकर, प्रफुल जनगम, आदर्श दुर्गे, दिलीप दुर्गे, प्रेमिला जनगम आणि इतर स्वयंसेवकांचे सक्रिय सहकार्य लाभले.
सत्र तीन विभागांमध्ये घेण्यात आले. इयत्ता 7 वी ते 10 वी विद्यार्थ्यांसाठी आवड ओळखणे, शिस्त पाळणे आणि अभ्यास मजबूत करण्यावर भर देण्यात आला. 10 वी ते 12 वी विद्यार्थ्यांसाठी योग्य शाखा निवड, स्पर्धा परीक्षा आणि करिअर संधी यावर मार्गदर्शन. 12 वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम, एमबीबीएस, नर्सिंग, पोलीस, इंजिनिअरिंग, समाजकार्य, कला अशा क्षेत्रातील संधी.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वेळेचे व्यवस्थापन आणि परीक्षा तयारी, कार्यक्रमात करिअर नियोजन, उद्दिष्ट निश्चित करणे आणि कौशल्य विकास यावर माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे छल्लेवाडा गावातील विद्यार्थ्यांमध्ये करिअर जागरूकता निर्माण झाली आणि त्यांना भविष्यासाठी योग्य दिशा मिळाली.