*अहेरी:-* तालुक्यातील जन्म प्रमाणपत्राच्या गरजू नागरिकांनी अर्ज केल्यानंतर दैनिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्याची अट अर्जदाराला घातली जाते. यासाठी विनाकारण खर्च होत असल्याने सदर जाहिरातीची अट रद्द करण्याची मागणी महागावचे उपसरपंच संजय अलोणे सह कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदनातून केली आहे.
जन्म प्रमाणपत्रासाठी अर्जदाराला दोन ,तीन हजार रुपये खर्च करून दैनिक वृत्तपत्रात जाहिरात द्यावी लागते. हा विनाकारण गरीब जनतेला पडलेला खर्च आहे. महागाईने होरपळत असलेल्या गरिबांना पुन्हा अशा प्रकारच्या अटी टाकून गरजूंना होरपडत ठेवणे बंद व्हावे यासाठी उपसरपंच संजय आलोणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार, तालुका अध्यक्ष विकी तोडसाम, सोशल मिडिया प्रमुख राकेश कोसरे व कार्यकर्त्यांनी तहसीलदाराला निवेदन दिले. निवेदन नायब तहसीलदार नरेंद्र दाते यांनी स्वीकारले.
सदर बाबीची दखल घेऊन गोरगरीब जनतेचा व विद्यार्थ्यांचा विचार करून वृत्तपत्रात जाहिरात देण्याची अट रद्द करण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.







