विकासकामांचे फलकच लावले नाहीत; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

39

विकासकामांचे फलकच लावले नाहीत; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

_ग्रामपंचायतीतील कोट्यवधींची कामे फलकाविना सुरू; ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर_
एटापल्ली: पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जारावंडी, सोहगाव, सरखेडा, वडसा खुर्द कोहका आणी तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींमध्ये सध्या कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे सुरू आहेत. आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शाळा, नाल्यांची व्यवस्था अशा विविध योजनांतून कामे केली जात आहेत. मात्र, या कामांबाबतची कोणतीही माहिती सार्वजनिक ठिकाणी दर्शविणारे फलक लावलेले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे

शासनाच्या नियमानुसार कोणतेही सार्वजनिक विकासकाम करताना त्या कामाची माहिती — जसे की कामाचे नाव, किंमत, निधीचा स्त्रोत, कंत्राटदाराचे नाव, कामाची मुदत, आणि संबंधित योजनेचा तपशील — स्पष्टपणे फलकावर लिहून स्थानिक ठिकाणी लावणे अनिवार्य आहे. या फलकांमुळे नागरिकांना कामाची पारदर्शक माहिती मिळते. तसेच कामात त्रुटी असल्यास संबंधित कंत्राटदार किंवा अधिकाऱ्यांना जाब विचारता येतो.
मात्र सदर ग्रामपंचायतींमध्ये फलक न लावता कामे सुरू आहेत. त्यामुळे या कामांमागे पारदर्शकतेचा अभाव दिसून येत असून, निधीचा योग्य उपयोग होतोय की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहेत.

एखाद्या रस्त्याच्या कामासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च होतो. पण प्रत्यक्षात केवळ पावसाळ्यातच तो रस्ता खराब होतो, हे चित्र सर्वत्र दिसते. जर काम सुरू करतानाच योग्य फलक लावले गेले असते, तर निधीच्या वापराची आणि कामाच्या गुणवत्तेची ग्रामस्थ स्तरावरही पाहणी होऊ शकली असती.
ग्रामपंचायत विभाग व पंचायत समितीने सर्व विकासकामांवर स्पष्ट माहिती असलेले फलक लावणे सक्तीचे करावे. तसेच अशा फलक न लावणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

*ग्रामसेवक की ठेकेदार? – सत्तेच्या छायेत उभं राहिलेलं संशयाचं साम्राज्य*

वरील ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या विकासकामांमध्ये एका विशिष्ट ग्रामसेवकाची महत्त्वाची भूमिका असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. सदर ग्रामसेवक अधिकृत शासकीय कर्तव्यांपेक्षा ठेकेदारीच्या कामांमध्ये अधिक रस घेत असल्याचे दिसत आहे. परिसरात त्यांची ओळखही ‘ग्रामसेवक’ म्हणून न राहता ‘ठेकेदार’ म्हणून झाल्याचे बोलले जात आहे. या व्यक्तीकडून अनेक ठिकाणी अवैध रेती व मुरूम वापरून कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार पंचायत समिती एटापल्ली व जिल्हा परिषद गडचिरोली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीत असूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. काही नागरिकांनी या ग्रामसेवकाविरोधात पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत तक्रार दाखल केली होती, मात्र तीही दुर्लक्षित करण्यात आली. ‘माझे हात थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही,’ अशा थेट धमकीवजा भाषा ही व्यक्ती वापरत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले. इतकेच नव्हे, तर या व्यक्तीने आपल्या पदाचा दुरुपयोग करत करोडो रुपयांची संपत्ती उभी केल्याची माहिती देखील एका विश्वसनीय सूत्राने दिली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर व प्रशासनाच्या निष्ठेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

*वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मूक पाठिंबा?*

सदर ग्रामसेवकाच्या गैरवर्तनाची माहिती पंचायत समिती एटापल्ली व जिल्हा परिषद गडचिरोली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना असूनही आजवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, ही बाब अधिक संशयास्पद ठरते. उलटपक्षी, या ग्रामसेवकाला अशा प्रकारचे काम करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. परिसरात हेही सांगितले जाते की, सदर ग्रामसेवक संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खिशे गरम करत असून, त्यामुळेच त्याच्याविरोधात कुठलीही चौकशी किंवा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत नाही. या साखळीवजा साठवणीमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत भ्रष्टाचाराचे जाळे पसरत असून, सामान्य जनतेच्या विश्वासाला तडा जात आहे.

“ज्या रस्त्यांवर किंवा अन्य विकासकामांवर फलक लावले गेले नाहीत, अशा सर्व कामांची चौकशी केली जाईल ,संबंधित कंत्राटदाराला तातडीने फलक लावण्याचे आदेश दिले जातील
कामाची चौकशी केल्यानंतर जर कोणतीही आर्थिक किंवा तांत्रिक अनियमितता आढळून आली, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”
*व्ही. टी. जुवारे*
_उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम एटापल्ली_